बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा
1 min read

बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा

Loading

बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा

आयुष्यभर आपल्या मालकाची सेवा करणाऱ्या बैलाच्या स्मरणार्थ त्याच्या विषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात शेतकरी वर्गात साजरा करण्यात येतो. या पोळ्याच्या काही जुन्या स्मृती आठवल्या तर आज सुद्धा मन भरून येते. साधारणतः तो काळ 1980 -85 च्या होता.त्या काळातला पावसाळा हा पोळ्या नंतर साधारण जर पाऊस पडला तर त्याला खानदेशात,” पुंण्या चा पाऊस” असं समजलं जायचं. कारण त्या काळात विहिरी, मोटारीचे प्रमाण कमी होतं. कोरडवाहू जमिनीत हा पाऊस आला तर हरभरा, दादर पिकाचे भरपूर उत्पन्न व्हायचे. गाई गुरांच्या, बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हायची. आजच्या काळात ऋतुमान बदलले असल्यामुळे पोळ्या नंतर श्रावण संपल्यानंतर आता बहुतेक भागात अतिवृष्टी होते. धरण भरतात .परंतु तो काळ वेगळा होता. त्या काळात दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असायचा. दळणवळण , तांत्रिक प्रगती, रस्ते ,पाणी व्यवस्थापन एवढं काही सुनियोजित नसल्यामुळेच शेतकऱ्याच्या अडचणीत खूप बाधा यायच्या. त्या काळात सुद्धा म्हणजे शेतकरी हा दोन बिघ्या च्या मालक असो अथवा वीस बियांचा असो त्याच्याकडे बैलजोडी असो ,सालदार असो सर्वांच्या आर्थिक अडचणी सारख्याच असायच्या.
अशा काळात श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा सण साजरा करणे म्हणजे घरी माय बापां ना खूपच चिंता पडलेली असायची. त्याला अर्थातच कारण आर्थिक परिस्थिती असायची. स्वतःजवळ असलेला जो काही पैसा अडका असेल तो शेतीत ओतला जात असे.
– आणि श्रावणाच्या शेवटी येणारा हा पोळा सण साजरा करण्यासाठी खिशात एक दमडी सुद्धा नसायची.
बापाची तगमग व्हायची. माय कडे विचारणा व्हायची. ती कुठून तरी गाडग्या मटक्याच्या उलचनी तून थोडेफार पैसे काढून द्यायची . आठवड्याचा धरणगावचा गुरुवारचा बाजार हा “सन बाजार “म्हणून परिचित असायचं .सारे व्यवहार देणे- घेणे याच बोलीवर गावात व्हायचे. या दिवशी सारा गाव पाऊलवाटेने बाजाराच्या दिशेने निघालेला असायचा .बैलगाडीच्या रस्ता वेगळा असायचा. बाप सालदाराला सोबत घेऊन निघायचा. त्यात अत्यंत काटकसरीने बैलांचे नवीन ज्योते, आऊत फाटा, बाशिंग, हिंगोयी ची डबी अस सर्व काही साज घेतला जायचा. सोबत घराला सन साजरा करण्यासाठी तेल, मीठ ,मिरची हा बाजार सुद्धा हक्काने असायचा .अशातच आमच्याकडे बैलजोडी मधील एक बैल आमच्या घरच्या गाईच्या गोरा होता. जो की ,आयुष्यभर आमच्या बैलगाडीच्या सोबती होता. त्याचे नावाच ‘घरच्या गाईच्या गोरा ‘असं होतं. कारण की एकत्र कुटुंबातला आणि गो मातेच्या पोटी जन्मला म्हणून श्रद्धेने आजोबांनी त्याला गाईच्या दुधासाठी मोकळे सोडले होते. त्यावेळी म्हशीच्या दुधाचे चलन असल्यामुळे त्याला असं दुधासाठी सोडून दिल्यामुळे तो सुरुवातीपासूनच कणखर, धष्टपुष्ट, पांढरा शुभ्र, डोळ्यात वेगळेच तेज असणारा आणि अत्यंत गरीब म्हणजे कुणालाही लाथा न मारणारा असा होता. त्याच्या अंगा खांद्यावर हात फिरवलं म्हणजे घरच्या गाईच्या गोऱ्या ची मैत्री कोणाशी जुळत असे . सालदार गडी त्याच्यावर विशेष खुश असत. कारण कामास तो तरबेज होता. पंधरा-वीस वर्षाच्या काळात त्याला कधी जोड मिळालीच नाही. त्याच्या सोबती चे तीन चार बैल बदलले गेले. परंतु त्याच्या चाली पुढे तो समोरच्या बैलाला मागे टाके. त्याला कधी आर टोचलेली चालत नसे. किंवा ती गरजच पडू देत नसे.
त्यामुळे त्याच्या जोडीला असणारा बैल नेहमी फिका पडत असे. अशा परिस्थितीत या घरच्या गाईच्या गोर्याचे नाव गावात सुद्धा होते .त्या काळात जर कोणाच्या घरी मयता चा, आजारपणाचा बाहेरगावाहून निरोप आला तर अशा वेळी त्या घरात पसरलेल्या दुःखद प्रसंगी , कुठे बाहेर गावी नातेवाईकांकडे जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे बैल गाडी शिवाय पर्याय नसायचा .अशा काळात ज्याच्याकडे बैल जोडी नसायची अशावेळी ग्रामीण भागात मदतीला शेकडो हात तत्पर असायचे. मग एखाद्याचे गाडे, एखाद्याच्या एक बैल आणि एखाद्याच्या दुसऱा बैल असा तो संच जमून लवकरात लवकर त्या दुःखद घरी पोहोचणे आवश्यक असायचे. या कामासाठी आमच्या घरच्या गाईच्या गोरा नेहमी अशा कामाला आमचे मायबाप देत असत.
आणि त्यानंतर मग एक दोन दिवसात जेव्हा त्या बैलाला घेऊन जाणारा कृतज्ञ पणे बोलायचा,
“तुम्हनां बैइललें गावम्हा जोड भेटाव नही.”
माय बापाचे ऊन भरून यायचे. बापाला खूप आनंद व्हायचा. बाप प्रेमाने त्याच्या मानेवर हात फिरवायचा तो सुद्धा बापाच्या खांद्यावर मान टाकायचा. असा हा आमचा घरचा, परिवारातला “घरच्या गाईचा गोरा ..!”
त्यामुळे वर्षभर जरी बापाला कुठल्या सणाची चिंता नसली तरी पोळा या सणाची खूप चिंता असायची.
आज वर्तमानातील पोळा सण साजरा करत असताना मन भूतकाळ धावते. काळाच्या ओघात नोकरीनिमित्त लांब जावे लागले .कधीतरी माय बापांशी गावी बोलणे व्हायचे. शेती मातीच्या गोष्टी व्हायच्या. त्यात घरच्या गाईचा गोरा वृद्धावस्थेत झुकल्याचे समजायचे. आता तो फक्त दावणीला बांधलेला दिसायचा. नवीन बैलजोडी घेण्यात आली परंतु याची सर कधीच आलीच नाही. बाप पोटतिडकीने बोलायचा.
काळाच्या ओघात यांत्रिक युग आले .तसे ट्रॅक्टर आलेत. सालदार ,गडी माणसं कमी झालेत . बैलगाडी बैलजोडी परवडेनाशी झाली. मी पण माझ्या नोकरीच्या ठिकाणी माझ्यात कामात गुंतलो. ज्या गावी गेलो त्या गावी पोळ्याच्या सणाला मातीचे बैल घेऊन सण साजरा करीत राहिलो.
अशातच कधी नव्हे ते बापाचे पोस्ट कार्ड सकाळच्या पहिल्या टपालाने आलेले होते .दोन ओळीच्या पत्रात “घरच्या गाईचा गोर्हा “गेल्याची बातमी त्यात होती. पत्रावर पाण्याचे पाच सात थेंब पडलेले होते. दोन पुसटश्या ओळी वाचताना हात थरथरले . मन भरून आले.
– कारण पत्रावर पडलेले पाच सात थेंब हे पाण्याचे नव्हते..!

गोकुळ बागूल
२१, टेलिफोन कॉलनी,
पिंपळे रोड ,मु. पो. अमळनेर
जि. जळगाव
मो.9422276140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *