उघड्यावर आलेल्या शंभर कुटुंबांसाठी रोटरी-रोटरॅक्टचा आधार   ढगफुटीसदृश्य पावसात उद्ध्वस्त कुटुंबांना जीवनदान
1 min read

उघड्यावर आलेल्या शंभर कुटुंबांसाठी रोटरी-रोटरॅक्टचा आधार ढगफुटीसदृश्य पावसात उद्ध्वस्त कुटुंबांना जीवनदान

Loading

उघड्यावर आलेल्या शंभर कुटुंबांसाठी रोटरी-रोटरॅक्टचा आधार

ढगफुटीसदृश्य पावसात उद्ध्वस्त कुटुंबांना जीवनदान

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा गाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सखोल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरून अनेक गरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पावसामुळे १०० हून अधिक कुटुंबे उघड्यावर आली. शासनाकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने रोटरी क्लब अमळनेर व रोटरॅक्ट क्लब अमळनेर यांनी तातडीने धाव घेत आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात दिला.

ढगफुटीसदृश्य पावसामुळे घरे व रस्ते पाण्याखाली गेले, कुटुंबांचा संसार वाहून गेला. या कठीण परिस्थितीत रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब सदस्यांनी एकत्र येऊन निधी उभारला आणि गरजूंना अन्नधान्य, ब्लँकेट्स, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे पॅक थेट वितरित केले.

मदतकार्यातील सक्रिय सहभाग

या मदतकार्यात प्रोजेक्ट चेअरमन रो. रोहित सिंघवी, रो. डॉ. राहुल मुठ्ठे, रो. डॉ. दिलीप भावसार, रो. वृषभ पारख, रो. राजेश बेदमुथा, रो. प्रतीक जैन यांनी पुढाकार घेतला.
रोटरॅक्ट क्लब अमळनेरच्या रोट. नितीश कोचर, रोट. हितेश बितराई, रोट. कुशल जैन, रोट. फलेश बोथरा यांच्यासह सर्व रोटरॅक्ट सदस्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून मदतकार्य यशस्वी केले.

उदार दात्यांचे सहकार्य

या उपक्रमासाठी सर्व रोटरी सदस्य तसेच अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. काहींनी रोख तर काहींनी वस्तू स्वरूपात मदत केली.
पातोंडा गावातील नागरिक राहुल शिवाजीराव पवार, संजय दौलत पवार, हेमंत जयप्रकाश पवार यांनी स्थानिक पातळीवर मोलाचे सहकार्य केले.

कौतुकास्पद उपक्रम

सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टी व पूरस्थितीने हाहाकार माजविला आहे. जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. अशा पार्श्वभूमीवर रोटरी क्लब अमळनेर व रोटरॅक्ट क्लब अमळनेर यांनी कमी वेळात उचललेले पाऊल आणि केलेले मदतकार्य समाजात अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे.

अध्यक्ष रो. देवेंद्र कोठारी व सचिव रो. आशिष चौधरी यांनी “कमी वेळेत अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल सर्व सदस्य, रोटरॅक्ट क्लब व नागरिकांचे आभार” मानले.

असे पी.आर.ओ. रो. अभिजीत सुभाष भांडारकर यांनी प्रसिद्धीपत्रकात कळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *