२४-२५ ऑगस्टला विचारपेरणीचा सोहळा – साथी गुलाब बापूंच्या स्मृतीसाठी अमळनेर सज्ज
![]()
२४-२५ ऑगस्टला विचारपेरणीचा सोहळा – साथी गुलाब बापूंच्या स्मृतीसाठी अमळनेर सज्ज
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेरची “मुलुख मैदान तोफ” म्हणून संपूर्ण खान्देशात लोकप्रिय असलेले जनतेचे लाडके माजी आमदार, शेतकऱ्यांचे खरे कैवारी आणि पत्रकारितेत वेगळा ठसा उमटविणारे साथी गुलाब बापू (गुलाबराव पाटील) यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी यावर्षीही भव्य स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सन १९७८, १९८० व १९९० मध्ये अमळनेर विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे गुलाब बापू “शिंगाड्यावाला शेतकरी नेता” म्हणून पूर्व-पश्चिम खान्देशात ओळखले जात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच साहित्य, पत्रकारिता, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रांत त्यांनी ठसा उमटवला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, खवय्येपणा, शत्रूला आपलेसे करण्याची अद्भुत क्षमता आणि अचानक निर्णयांनी राजकारणात खळबळ उडविण्याची शैली होती.
त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने “साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह” आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत “भारतीय संविधानाची ७५ वर्षे – एक चिंतन”, “आज गांधीजी असते तर…”, “शेतकरी कष्टकऱ्यांचे कैवारी – सानेगुरुजी”, “कृत्रिम बुद्धिमत्ता : आधार की आव्हान?” आणि “अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस” असे विषय ठेवण्यात आले आहेत. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक ₹११,०००, द्वितीय ₹९,०००, तृतीय ₹७,००० तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ₹२,००० रोख रक्कम, आकर्षक स्मृती चिन्ह व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
यानंतर २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता त्याच नाट्यगृहात स्मृती पुरस्कार सोहळा होणार आहे. यामध्ये सामाजिक व राजकीय (पुरोगामी) पुरस्कार प्रदान केले जाणार असून पुरस्कार विजेत्यांना ₹२१,००० रोख रक्कम, “शिंगाडेधारी गुलाबराव पाटील” स्मृती चिन्ह, लाल टोपी आणि बागायतदार रुमाल देण्यात येईल.
या सोहळ्याला मा. आमदार बच्चुभाऊ कडू (अचलपूर, जि. अमरावती) आणि ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते निरंजन टकले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचारमंथनातून शेतकऱ्यांना दिशा, तरुणांना प्रेरणा, महिलांना सुरक्षिततेचा विश्वास आणि दिव्यांग व वंचित घटकांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
या कार्यक्रमासाठी सामाजिक पुरस्कार निवड समिती, राजकीय पुरस्कार निवड समिती, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन समिती तसेच स्मृती समारोह आयोजन समितीसह अनेक समित्या गठित करण्यात आल्या आहेत. अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की – “या स्मृती समारोहातून संविधान बचाव, समाजहित, शेतकरी कल्याण आणि तरुणाईला योग्य दिशा मिळावी हा मुख्य हेतू आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारपेरणीच्या कार्यक्रमाला यशस्वी करावे.”



