तिमिरातुनी तेजाकडे’ वास्तवतेचा मार्ग दाखविणारी पुस्तिका! -संदीप घोरपडे, स्वातंत्र्य दिनास प्रकाशन सोहळासंपन्न
![]()
‘तिमिरातुनी तेजाकडे’ वास्तवतेचा मार्ग दाखविणारी पुस्तिका!
-संदीप घोरपडे
स्वातंत्र्य दिनास प्रकाशन सोहळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी- उमलत्या वयात स्वतःच्या शरीराबद्दल अनेक प्रश्न पडतात, त्याचे शास्त्रीय उत्तर मिळाले नाही तर मुले मुले मानसिक आरोग्य खराब करून घेतात हे टाळावे म्हणून सोप्या शब्दात लैंगिक शिक्षण देणारी ही पुस्तिका निश्चित मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन संदीप घोरपडे यांनी केले.
ते प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ जयेश शिंदे यांच्या तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तकाचे प्रकाशन करताना बोलत होते.
श्री. घोरपडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,आज जगभर वाढणारी हिंसकता ही सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने अधिक हिंस्र होताना दिसते आणि अत्यंत नैसर्गिकरित्या लैंगिक भावनांचा होणारा चढता आलेख या सोशल मीडियाच्या पॉर्न फिल्म अश्लील रील्स यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे रासायनिक खतांचा वापर करून पिके अवेळी मोठी केली जातात त्याच प्रकारे
किशोरवयीन अवस्थेतच आमची एकविसाव्या शतकातील लहान मुले मुली तारुण्याच्या उंबरठ्यावर जाऊन उभे राहिले आणि याला संस्कृतीच्या नावाखाली अज्ञानात राहिलेले तरुण मुले मुली जणू काही सोशल मीडियामुळे ज्ञानाचा खजिनाच हाती लागला असे समजून लैंगिककडे विकृत नजरेने पाहू लागले या साऱ्यांना या पुस्तकामुळे शंभर टक्के शास्त्रशुद्ध उत्तरे मिळतील.
स्वातंत्र्य दिनास हा प्रकाशन सोहळा संदीप घोरपडे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. साने गुरुजी विद्यालयात झालेल्या या सोहळ्यास पुस्तक शब्दबद्ध करणारे धनंजय सोनार, डॉ प्रतिज्ञा शिंदे, हेमकांत पाटील, कस्तुरी प्रकाशनचे गोकुळ बागुल, माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख, पत्रकार किरण पाटील, मगन पाटील, भास्कर बोरसे, प्रभाकर गुरुजी, शकील शेख, महाजन मॅडम, बोरसे मॅडम, सानेगुरुजी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक संजीव पाटील, सूत्रसंचालन रत्नपारखी तर बापूराव ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.

