शिरूडमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा व बक्षीस वितरण उत्साहात
![]()
शिरूडमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा व बक्षीस वितरण उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी – १५ ऑगस्ट २०२५ रोजी व्हि.झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, वि.का. सोसायटी, श्री दत्त सार्वजनिक वाचनालय, जिल्हा परिषद मराठी शाळा येथे ध्वजारोहण सोहळे पार पाडून, प्रभात फेरीची सांगता व्हि.झेड. पाटील हायस्कूलमध्ये करण्यात आली.
मुख्य सोहळ्यात मा. सौ. योजना जितेंद्र पाटील (शालेय समिती सदस्य) यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन व ध्वजारोहण झाले. यानंतर विद्यार्थ्यांना गोडपदार्थ (बिस्किटे) वाटप करण्यात आले.
शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कै. दादासाहेब रामदास आधार मोरे यांच्या स्मरणार्थ गुलाब रामदास मोरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना वॉटर चिलर मशीन भेट दिली. तसेच श्री. योगेश लोटन बाविस्कर यांनी एका गळक्या वर्गाच्या छपराची पत्रे बदलून देण्याची घोषणा केली. दोन्ही दात्यांचा शाळा परिवार व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
शालेय समिती अध्यक्षा श्रीमती पुष्पलता अशोक पाटील, मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी, समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, आजी-माजी सैनिक, ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच, माजी सरपंच, वाचनालय संचालक मंडळ, दूध उत्पादक सोसायटी संचालक, पोलिस पाटील, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात देशभक्ती, शिक्षण व प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अखेरीस विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

