पावसाअभावी अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम उध्वस्त; शेतकरी आकाशाकडे टक लावून प्रतीक्षेत
![]()
पावसाअभावी अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम उध्वस्त; शेतकरी आकाशाकडे टक लावून प्रतीक्षेत
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुका मागील वीस दिवसांपासून अमळनेर तालुक्यात एक थेंबही पाऊस न झाल्याने खरीप हंगाम 2025 गंभीर संकटात सापडला आहे. शिरूड परिसरातील मका, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद यांसारखी पिके तब्बल 70% वाया गेली आहेत. याचबरोबर शिरूड,कळमसरे, मारवड, देवगाव देवळी, गडखांब, दहीवद, अमळगाव,मंगरूळ, वावडे परिसरात आदी गावांमध्येही हजारो रुपयांचे बियाणे, फवारणी व मजुरी खर्च करून उभे केलेले पीक पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर आहे.
आज शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रल्हाद पाटील, मुरलीधर पाटील यांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली असता, नजरेस आलेले दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. पिकांची पाने पिवळसर वाळलेली, माती चिरा पडून कोरडी, तर विहिरींमध्ये पाणीच नाही. आतापर्यंत कोणत्याही शेतातून पाणी वाहून गेले नाही; गावात लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी पावसासाठी देवदेवतांना साकळे घालून, प्रार्थना करून वरुणराजाला पाचारण करत आहेत. तरीही पाऊस न आल्याने त्यांची निराशा दिवसेंदिवस वाढत आहे. जेमतेम पावसावर कसाबसा तग धरून उभे असलेले पीक आता करपण्याच्या मार्गावर आहे.
तालुक्यात सर्वत्र शासनाकडे एकच आर्त हाक उमटत आहे — “कृत्रिम पावसाची तात्काळ व्यवस्था करून आम्हा शेतकऱ्यांना जीवदान द्या”. ग्रामीण भागात चर्चा रंगली आहे की, पावसाअभावी केवळ पीक नव्हे तर शेतकऱ्यांचे कष्ट, आशा आणि भविष्य सर्व धुळीस मिळत आहे.
—

