विद्यार्थी शैक्षणिक दत्तक मोहीम” शासनमान्यतेसाठी अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
विद्यार्थी शैक्षणिक दत्तक मोहीम” शासनमान्यतेसाठी अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) — समाजातील होतकरू, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेल्या अमळनेर PTA क्लासेस संघटनेने आपल्या “विद्यार्थी शैक्षणिक दत्तक मोहिमे”ला शासनमान्यता मिळावी, तसेच शाबासकी देऊन गौरव व्हावा, यासाठी दि. 8 ऑगस्ट रोजी मा. प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना निवेदन सादर केले.
या मोहिमेद्वारे संघटनेने केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर मानवी संवेदनांची उब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. नि:शुल्क क्लासेस, पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्य यांची उपलब्धता करून देत, संघटनेचे शिक्षकवर्ग अनाथ, गरजू आणि शिक्षणाच्या टप्प्यावर अडथळा आलेल्या विद्यार्थ्यांना सतत आधार देत आहेत.
“ही केवळ मदत नाही, तर मुलांच्या भविष्यासाठीचा आपुलकीचा शब्द आहे,” असे संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शासनमान्यता आणि अधिकृत शाबासकी मिळाल्यास आमच्या कार्यात नवी ऊर्जा मिळेल आणि आम्ही समाजासाठी आणखी भव्य-दिव्य उपक्रम राबवू शकू.
पंधरा वर्षांच्या या सततच्या प्रयत्नांमुळे असंख्य विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणप्रवास खंडित न होता पूर्ण केला. या मोहिमेला शासनमान्यता मिळाल्यास, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक मोठे पाऊल पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

