अमळनेर आयटीआयचे नामकरण “संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था”, विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: पुण्याहून ‘साईनिमिरो’ कंपनीच्या नियुक्तीसाठी २५ जुनला अमळनेरमध्ये कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम
![]()
अमळनेर आयटीआयचे नामकरण “संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था”
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: पुण्याहून ‘साईनिमिरो’ कंपनीच्या नियुक्तीसाठी २५ जुनला अमळनेरमध्ये कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णय क्र. आयटीआय-२०२४/प्र.क्र.१२४/व्यशी-३ द्वारे अमळनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण “संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे करण्यात आले आहे. श्री संत सखाराम महाराज यांच्या नावे संस्थेच्या नावकरणानंतर “सद्गुरू श्री सखाराम महाराज विठ्ठल रखुमाई संस्थान अमळनेर पंढरपूर” या संस्थेच्या वतीने या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासकार्यात सहभाग घेण्याचे विचार सुरु आहेत.
या उपक्रमांच्या संदर्भात, संस्थेतील विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी २५ जून २०१५ रोजी कॅम्पस प्लेसमेंट आयोजित करण्यात येत आहे. पुणे येथील यांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य निर्यातक कंपनी “साईनिमिरो निर्माण प्रायव्हेट लिमिटेड” चे अधिकारी निवडीसाठी अमळनेर येथे येतील. यामुळे अमळनेर आणि ग्रामीण भागातील आयटीआय विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिकत असताना मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी संस्थेच्या परिसरातच उपलब्ध होणार आहे.
कॅम्पस प्लेसमेंटच्या या घोषणेमुळे संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाची लाट पसरलेली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे प्रशिक्षण घेतलेले माजी विद्यार्थीही या संधीचा लाभ घेऊ शकतात. माजी विद्यार्थ्यांनी २४ जूनपर्यंत आपली नावे संस्थेत नोंदवणे आवश्यक आहे. तसेच २५ जून रोजी सकाळी १० वाजता सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे संस्थेचे प्राचार्य श्री ए. बी. देव यांनी आवाहन केले आहे.
या पुढाकारामुळे नवनवीन कौशल्य विकसित करणाऱ्या युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यास एक मोठा मार्ग उघडेल, तसेच स्थानिक आर्थिक विकासाला भरभराटीचा हातभार लागणार आहे.
अमळनेरच्या ज्ञान आणि रोजगार क्षेत्राला नवा श्रीमंत भवितव्य मिळवून देणाऱ्या या उपक्रमाला भरभराट मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

