देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश
1 min read

देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश

Loading

देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)–
देशमुख नगर येथे नुकत्याच मराठा महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा यशस्वीपणे पार पडली. या सभेत महिलांनी कुटुंबातील सुसंवाद, मुलींच्या सुरक्षित शिक्षणासह लैंगिक जागरूकता, सामाजिक समस्या आणि आधुनिक काळातील आव्हानांवर सखोल आणि खुले मनाने चर्चा केली.
मराठा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष तिलोत्तामाताई पाटील, अध्यक्ष प्रा. शीला पाटील, वसुंधरा ताई लांडगे, प्रा. डॉ. वंदनाताई पाटील, लीना पाटील, भारती अक्का, अल्का पाटील, मनीषा पाटील, सुलोचना वाघ, पद्मजा पाटील, डॉ. भारती पाटील आणि भारती एस. पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना मंडळाच्या अध्यक्ष प्रा. शीला पाटील यांनी मुलींच्या आत्मविश्वासासाठी घरातील सुसंवादाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलींच्या वह्या किंवा मोबाईल वेळोवेळी तपासण्याऐवजी त्यांना चुका सुधारण्यासाठी मोकळा मनाने संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पालकांचे प्रेमळ, सकारात्मक वर्तन मुलींच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आजच्या काळात लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि ऑनलाईन सुरक्षिततेबाबत जागरूकतेचा तितकाच महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्लॅकमेलिंग, फसवणूक, आणि भावनिक ताणामुळे मुलींना होणाऱ्या त्रासांपासून वाचवण्यासाठी पालकांनी सजग आणि सहयोगी वातावरण तयार करावे, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. वंदनाताई पाटील यांनी पुणे-मुंबईतील व्यसनाधीन तरुण पिढीबाबत चिंता व्यक्त केली. सोशल मिडियावरील उत्तेजक दृश्यांपासून सावधता बाळगावी, तसेच मुलींना केवळ शिक्षित नाही तर सुसंस्कृत बनविले पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यक्रमात केले.
खान्देश मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज सांगितली. मुले-मुली यांना समान वागणूक देणे, आईंच्या जबाबदाऱ्या सहन करणे आणि संपूर्ण कुटुंबातील संस्कारांना अधिक महत्त्व देणे आवश्यक असून, मोबाईलचा नियंत्रित वापर करावा अशी सूचना त्यांनी उपस्थितांना दिली.
या सहविचार सभेला मराठा महिला मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी मंडळाच्या सदस्य रेखा मराठे यांनी आभार प्रदर्शन करीत आयोजन यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले.
मराठा महिला मंडळ या उपक्रमाचा पुढील टप्पा अमळनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये महीला सभा घेणार असून, महिला सशक्तीकरण आणि सामाजिक जागरूकता वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणार आहेत. या सभेमुळे महिलांच्या स्वावलंबनाचा आणि सामाजिक भागीदारीचा नवा ध्यास निर्माण होण्याची खात्री व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *