भारताला जगाच्या नकाशावर झळकविणारा महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!!!
1 min read

भारताला जगाच्या नकाशावर झळकविणारा महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!!!

Loading

भारताला जगाच्या नकाशावर झळकविणारा महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!!!

भारतात अनेक थोर पुरुष होऊन गेले त्यात बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होऊ शकत नाही.. मनुस्मृतीच्या विचाराने चालणाऱ्या या देशांमध्ये जाती जातीत, धर्माधर्मात भेद होता.. स्वतःला उच्च समजणारी जमात विषमतेची पाळी पाळेमुळे खोल रुजवत होती. अशा काळामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म महू येथील छावणीत झाला.तो दिवस होता १४ एप्रिल १८९१ चा अशा दिवशी भारताच्या संविधान निर्मात्याचा जन्म होय…माता भिमाबाई एक भावनिक महिला होती.अनेक कष्ट घेऊन तिने पोरा बाळांना सांभाळले.ती जास्त काळ टिकली नाही.भिमा लहान असताना आई वारली.वडील रामजी आंबेडकर अभ्यासू व्यक्तिमत्व होते. सैन्यात सुभेदार होते. त्यांना वाचनाची आवड होती. आपल्या मुलांनी खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात साकार केली. बाबासाहेबांना अनेक पुस्तके आणून देऊन त्यांना पुस्तक वाचनाची सवय लावली. बाळ भीमा वाचण्याच्या दुर्दम्य इच्छेने झपाटलेला होता. विषमतेच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना ‌ उच्चवर्णीय गुरुजींनी त्याला वर्गाबाहेर बसवले. भीमाने वर्ग बाहेर राहुन शिक्षण घेतले. लहानपणापासून आलेला संघर्ष झेलत बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण केले. दहावी पास झाल्यानंतर कृष्णाजी अर्जुन केळुस्कर ह्या गुरुजींच्या मार्गदर्शनाने पुढील शिक्षणाची वाटचाल सुरू झाली. केळुस्कर गुरुजींनी दिलेल्या गौतम बुद्धाच्या चरित्राने बाबासाहेबांच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विचार असू शकतो याची जाण झाली. सत्य शोधणारा बुद्ध धम्म आवडला. जातीविरहित ,धर्मविरहित , समानता असलेला बुद्ध धम्म त्यांनी १९५६ मध्ये स्वीकारला. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या सहकार्यामुळे विदेशामध्ये शिक्षण घेता आले. शाहू महाराजांच्या केलेल्या मदतीने एका वंचित समाजातील मुलगा विदेशात जाऊन सर्वोच्च पदवी प्राप्त करून येतो. त्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाहू महाराज त्याच्या घरी जाऊन करतात . भारतातून विदेशात जाऊन अनेक पदवी घेणारे पहिले विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. जगामध्ये सर्वात जास्त पुतळे असलेल्या महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. जागतिक विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांची नोंद होते. कोणत्याही धर्माला सोबत न घेता चिकित्सक, विवेकी, सत्यशोधक, अहिंसा जोपासणाऱ्या विचाराला बाबासाहेबांनी स्वीकारले. जगामध्ये मानवता उभी करण्यासाठी सारे आयुष्य खर्ची घातले. भारतामध्ये धुमाकूळ गावात असलेला मनुवादी दृष्टिकोणाला बाबासाहेबांनी हाणून पाडले. जगाच्या पाठीवर संविधान निर्माण करून अप्रतिम प्रतीचे विश्वबंधुत्वाची दृष्टी देणारे असे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिले. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर पर्याय म्हणून अनेक कायदे केले. हिंदू कोड बिल तयार करून महिलांना अधिक हक्क दिले. भारतात निवडणूक झाली त्यावेळी महिला व पुरुष अशा दोन्ही घटकांना मतदान करण्याच्या हक्क डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळाला. जगामध्ये अर्थकारणाच्या अभ्यासासाठी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहून जगाला रुपयाची किंमत समजली. अनेक देश डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून देशाची प्रगती करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेच्या विरुद्ध चालू असलेले मनुवादी कारस्थान यावर आपल्या लेखणीने कठोर प्रहार केले. भारतामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेला मनुवादी कायदा जो सवर्ण लोकांना प्राधान्य देणारा होता. त्याला महाड येथे झाळून त्याचे होळी केली. संविधानातील कलम 13 याद्वारे मागील कोणतेही अन्यायकारक कायदे यापुढे लागू होणार नाही असे कायद्याद्वारे नमूद करून अ मानवी कायदे संपुष्टात आणले. जर पूर्वीचे अलिखित कायदे आज चालू असते तर वंचित, गरीब ,अस्पृश्य लोकांना जगणे कठीण झाले असते. आज सुद्धा बरे आहेत मंदिरांमध्ये अस्पृश्य लोकांना जाता येत नाही. बऱ्याच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही. अनेक भांडवलदारांच्या शिक्षण संस्थेमध्ये गरिबांना स्थान नाही. खाजगीकरण नावाचा भस्मासुर निर्माण करून बहुजनांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र चालू झालेले आहे. भांडवलदारांच्या ताब्यात एअर इंडिया सारखे ते बीएसएनएल यासारखे तसेच अनेक उद्योग दिले गेलेले आहे. शैक्षणिक संस्था सुद्धा भविष्यात भांडवलदारांच्या घशात घातलेल्या आहे. ज्याला शिक्षणाचा गंध नाही तो काय बहुजनांचे हित साधणार? शैक्षणिक संस्थेद्वारे अवाढव्य फी ठेवून कायमस्वरूपी गरीब वंचित बहुजन शिक्षणापासून दूर जातील अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. विशिष्ट भांडवलदार या देशावर सत्ता गाजवतील. समान नागरी कायदा आणण्याची भाषा करणारे लोक सर्वांना समान जमीन, नोकरी, शेती, नियम देण्याचे नाकारतात.भारतात धार्मिक कारणावरून वातावरण बिघडवण्याचे काम चालू आहे. कोणतीच धार्मिक सत्ता राजकारणात ढवळाढवळ करणार नाही असे राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष कलमात दिलेले आहे. तरी विशिष्ट धर्माचा उदो उदो करणे हे सर्रास सुरू आहे. भांडवलदार धार्मिक स्थळांचा उपयोग आपले हित साधण्यासाठी करीत आहे. प्रत्येक धर्मात कर्मठ विचार पोसले जात आहे. शिक्षणावर खर्च करण्याऐवजी धार्मिक स्थळावर खर्च केले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही अजून तरी अस्तित्वात दिसत नाही. न्यायव्यवस्था दुबळी झाली आहे. एका न्यायासाठी 30/ 40 वर्ष होऊन सुद्धा न्याय मिळत नाही. सामाजिक प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांचे मुदडे पाडले जात आहे परंतु तपास यंत्रणा त्यांच्या मुसळ्या आवळण्यासाठी कमी पडत आहे. गुन्हेगारी सर्रास वाढलेली आहे. राजकारण्यांचे पंटर राजरोषपणे हुकूमशाही गाजवत आहे. राजकारण्यांची मित्र नेहमी गुंड आढळतात. निवडणूक विना पैशाने पार पाडली जात नाही. सर्व राजकारणी पैशाच्या जोरावर निवडून येतात. रात्रभर पैसा वाटप होतो परंतु प्रशासन यंत्रणेला कसा सुगावा लागत नाही.हे मोठे गौडबंगाल आहे. दिवसेंदिवस स्त्रियांवर अत्याचार होत आहे तरी देखील त्यावर ठोस उपाय होतांना दिसत नाही. प्रसार माध्यमे राजकारण्यांच्या दावणीला बांधलेली आहे. समाज प्रबोधनात्मक कोणतीही हालचाल प्रसार माध्यमावर होताना दिसत नाही.मालीका समाजाला अंधश्रद्धाकडे घेऊन जात आहे. मानव धार्मिक श्रद्धायुक्त होण्याऐवजी अंधश्रद्धा जोपासत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल असा कोणताही दुवा मालिकांमध्ये दिसत नाही. ज्या देशांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढत नाही त्या देशामध्ये विवेक विचार वाढत नाही. अरब देशात धार्मिक कर्मकांडांमुळे व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळत नाही. ग्रंथ प्रामाण्य अजूनही बऱ्यापैकी समाजात थैमान घालत आहे. प्रत्येक समाजाने सत्याचा विचार स्वीकारला पाहिजे . त्यासाठी निर्माण होणाऱ्या साहित्यही तेवढे प्रभावी असायला पाहिजे. सॉक्रेटिस ,गॅलेलियो, आईन्स्टाईन, ॲरिस्टॉटल, प्लेटो यांचे विचार समाजामध्ये रुजले त्यावेळी सामाजिक क्रांती झाली.भारतात समाजा समाजात वाद पसरवले जात आहे. अशा काळात संविधान निर्मात्याला अपेक्षित असलेला समाज आपण कसा निर्माण करू शकू हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक समानता आली नाही. विशिष्ट समाजाकडे अभिनय क्षेत्र ताब्यात असल्याने इतर समाजाला गुणवत्ता असून सुद्धा संधी मिळत नाही. व्यापार सुद्धा विशिष्ट वर्ग सांभाळतो त्याचे सामान्यीकरण झाले नाही. विशिष्ट गोष्टींवर उच्च समाजाचे वर्सस्व अबाधित आहे त्यामुळे समानता रुजलेली नाही. कष्ट करणारा वर्ग उपाशी आहे तर वरवर मलई खाणारा वर्ग मालामाल होत आहे. देशातला हमाल ते श्रीमंत यामध्ये कमालीची दरी निर्माण झाली आहे. कष्टाला समान न्याय नाही. भारताच्या सीमेवर संरक्षण करणारा सैनिक याला कॉन्ट्रॅक्ट बेस वर नियुक्ती करून जो आपली संरक्षणाची जबाबदारी घेतो त्याला नगण्य किंमत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात सामाजिक न्यायाचे स्वप्न पाहिले होते परंतु ते धुळीस मिळाले आहे. भविष्यात सामान्य वर्गाला सरकारी नोकरी मिळणे अशक्य आहे. कारण खाजगीकरण वाढल्याने भांडवलदारांची हुकूमशाही वाढत जाईल आणि त्यामुळे त्यांना वाटेल त्याला ते कामाला ठेवते. त्यांना ज्यांना डावलायचे आहे त्यांना ते पद्धतशीरपणे डावातील. आजच नोकरदाराचा मुलगा डॉक्टर होणे त्याला दिवा स्वप्नासारखे झाले आहे. भांडवलदारांचे कोट्यावधी कर्ज माफ केले जात आहे. शेतकऱ्याचे किरकोळ कर्ज त्याला वारंवार अपमानित करून वसुल केले जात आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी नदीजोड संकल्पना अमलात आणण्याची योजना आखली होती. परंतु भारतामध्ये राजकारण्यांच्या विचारात ती कल्पना दिसत नाही. पर्यायाने शेतकरी काबाडकष्ट करून गरीब राहत आहे. सामान्य लोकांना घरे बांधणे शक्य होत नाही कारण अवाढव्य मालाच्या किमती वाढल्या आहेत. नोकरवर्गांना महागाई भत्ता देऊन त्याच्याकडून कराच्या त्याच्या रुपात तो वसूल केला जात आहे. ज्या घटकांवर अन्याय होतो तो घटक अगदी स्वस्त पडलेला आहे. आपल्या पायाखालील वाळू कधीचीच निसटली आहे. संविधानावर केवळ चर्चा होतात संविधान वाचवण्याची जबाबदारी कोणीही घेत नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला विचार हा उन्नतीचा विचार आहे. हा विचार मेंदूत न बसवता तो केवळ बोलण्यातून व्यक्त होतो त्यामुळे कृती होताना दिसत नाही. संघर्ष करण्यासाठी कोणीही धजावत नाही. साहित्याची योग्य मांडणी डॉक्टर बाबासाहेबांनी करून दिलेली आहे. ज्या महापुरुषाने आयुष्यभर पुस्तकांची सेवा केली. पुस्तकातून खरा विचार समाजाला दिला. विचार करण्याचे नवे भान दिले. महापुरुषाने दिलेल्या विचाराला महत्व भारतामध्ये मिळत नाही हे खेदाची गोष्ट आहे.

लेखक

सोपान भवरे

विशेष प्रतिनिधी

मराठी लाईव्ह न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *