विद्यार्थ्यांनो अभ्यासासोबत प्रामाणिकपणा महत्वाचा,आई वडिलांना फसवू नका- निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर
![]()
विद्यार्थ्यांनो अभ्यासासोबत प्रामाणिकपणा महत्वाचा,आई वडिलांना फसवू नका-
निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आज प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अधीक्षक विजय सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. डी वाय एस पी सुनील नंदवाळकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की स्पर्धा परीक्षेत यश हमखास मिळते परंतु त्यासाठी स्वतः आवड निर्माण करावी लागते तेवढाच प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागतो आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलो तर स्पर्धा परीक्षेतून यश लवकर मिळते.आपण काय करीत आहोत, काय करणार आहोत याची वास्तविक कल्पना आई-वडिलांना असू द्या त्यांना कधीही फसवू नका, जे कराल तेच प्रामाणिकपणे त्यांना सांगा. ज्या दिवशी तुमचा प्रामाणिकपणा आई-वडिलांना कळेल तो त्यांच्यासाठी सर्वाधिक आनंदाचा दिवस असेल. मोबाईलचा कमीत कमी वापर करा अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. चोवीस तासाचे नियोजन करा सकाळी लवकर उठून योग प्राणायाम करा त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते व अभ्यास चांगला होतो. पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे काम कौतुकास्पद आहे या केंद्रात मोफत मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे यापुढे अनेक विद्यार्थी यशस्वी होतील. साने गुरुजी ग्रंथालयाने तुमच्यासाठी फार मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधीचे सोने करा व एक दिवस याच वाचनालयात यशस्वी होऊन सत्कार स्वीकारा. मी सदैव या स्पर्धा परीक्षा केंद्राला मार्गदर्शन करण्यासाठी बांधील आहे मला जेव्हा जेव्हा बोलवाल त्या त्या वेळेस मी नक्की येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करेल.त्याच बरोबर अनेक महत्त्वाच्या टिप्स डीवायएसपी नंदवाडकर यांनी आपल्या भाषणातून दिल्या.
सूत्र संचलन व आभार प्रदर्शन केंद्र संचालक विजयसिंग पवार यांनी केले.


