संविधान भारताचा अनमोल ठेवा- रवींद्र शिंदे
![]()
संविधान भारताचा अनमोल ठेवा आहे : रवींद्र शिंदे
__________________________________________
जळगाव :- भारताचे संविधानाने आम्हाला केवळ अधिकारच दिलेले नाही तर लोकांना माणूसपण , स्वाभिमान बहाल करून देशात समता , स्वातंत्र्य ही मूल्ये रुजवून नवी क्रांती केली आहे . देशाची अखंडता कायम राखण्या आवश्यक त्या तरतुदी मांडून संविधानाने जगा समोर नवा आदर्श निर्माण केला आहे म्हणूनच आपले संविधान आपल्या देशाचा एक अनमोल ठेवा आहे असे विचार प्रसिद्ध पत्रकार रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले .
अजिंठा हाउसिंग सोसायटी, जळगाव येथे प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना शिंदे बोलत होते .
आपल्या भाषणात रवींद्र शिंदे यांनी पुढं सांगितले की , भारतात गेल्या दहा वर्षांपासून संविधान देशाच्या केंद्रस्थानी राहिले आहे . संविधानाच्या मुद्यावर काहींनी निवडणूक लढविली त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनते पर्यंत संविधान हा विषय पोहचला व त्या विषयी मोठी जागरूकता झाली , लहान लहान मुलं सुध्दा प्रस्तविकेचे वाचन करू लागले हे मोठे यशच आहे .
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबाना संविधान सभेवर जाण्या करिता झालेला विरोध , प्रत्यक्ष संविधान निर्मिती करिता त्यांनी घेतलेले कष्ट या बद्दल सविस्तर मांडणी करून त्यांनी जगभरातील १८ देशांच्या संविधानाचा बारकाईने जसा अभ्यास केला तसाच भारताच्या विविध संस्कृती , धर्म , जातीव्यवस्था , भाषा , वंश या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून सर्वांना त्यांनी न्याय दिलेला आहे म्हणून सर्व भारतीयांना ते आपलेच संविधान आहे असे वाटते असे विचार व्यक्त केले .
प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय संविधानाने देशातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, देशात शांतता , परस्पर सामंजस्य , जाती जातीत एकता , स्त्री पुरुष समानता कायम राखण्या करिता आवश्यक त्या सर्व बाबी आम्हाला दिल्या आहेत . आदर्श राज्यकारभार करता येणारी सर्व संवैधानीक मूल्ये त्यात अस्तांता आम्ही ती मूल्ये न स्वीकारता राज्यकारभाराची नवी मूल्ये मांडत आहोत या मुळे देशात संविधाना विषयी संभ्रम निर्माण होतो .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भालेराव , प्रास्ताविक चेअरमन दिलीप सपकाळे , स्वागत निलेश सैंदाणे , आभार प्रदर्शन कविता सपकाळे यांनी केले .
सुरवातीस झेंडावंदन , संविधानाचे व बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले . या प्रसंगी ॲड. आनंद कोचूरे , राहुल बैसाणे यांचा गौरव करण्यात आला .
या प्रसंगी पी. डी. सोनवणे, प्रवीण नन्नवरे , विजय भालेराव , दिलीप तासखेडकर, अशोक सैंदाणे , चंद्रशेखर अहिरराव , सुनील बिऱ्हाडे , विजया शेजवळे , सुनंदा वाघ , सुमन बैसाणे , दीपक साळवे , नूतन तासखेडकर, कल्पना तायडे , आशा सपकाळे , सरला भालेराव , चारुशीला सुरळके , लता बिऱ्हाडे आदींसह स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

