डॉ. भाग्यश्री वानखेडे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड
![]()
डॉ. भाग्यश्री वानखेडे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड
अमळनेर दि.१७ – येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिक्षक डॉ. भाग्यश्री रामदास वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या “सर्जनशीलता संवर्धन: विद्यार्थ्यांच्या क्षमतेला प्रज्वलित करणे” या उपक्रमाची राज्यस्तरीय निवड झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी डॉ. वानखेडे यांचे अथक प्रयत्न आणि नावीन्यपूर्ण दृष्टीकोन प्रशंसनीय ठरले आहेत. शासनातर्फे जळगांव येथे झालेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पधेत सदरची निवड झाली.
डॉ. वानखेडे यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी “इको-योद्धे कृतीत,” आरोग्य जागरूकतेसाठी “वेलनेस वॉरियर्स,” शाश्वत ऊर्जा उपक्रमासाठी “पॉवर अप!” आणि नेतृत्व विकासासाठी “उद्याचे नेते” यांसारखे विविध प्रकल्प राबविण्यात आले.
त्याशिवाय, डॉ. वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना सर्जनशीलता आणि त्यांच्या वैयक्तिक कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके आयोजित केली. विद्यार्थ्यांनी कलाविष्कार, विज्ञान प्रकल्प, हस्तलिखित मासिके, आणि संवाद कौशल्यावर आधारित उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. या सर्व उपक्रमांनी विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरच नव्हे, तर जिल्हा व राज्यस्तरावरही उत्कृष्टता मिळवून दिली.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये “संपर्क वाद-विवाद,” “सर्जनशील लेखन,” “कलात्मक प्रदर्शन,” आणि “सामाजिक जाणीव निर्माण करणारे प्रकल्प” विशेष महत्त्वाचे ठरले. तसेच, विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांनी विज्ञान प्रदर्शन, ऊर्जा संवर्धनाविषयी चर्चासत्रे, आणि सामाजिक सेवा उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य के. डी. पाटील आणि अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी डॉ. वानखेडे यांचे अभिनंदन केले आहे.

