अक्षय्यतृतीया : भारतीय मूळ संस्कृतीचा हलोत्सव
![]()

अक्षय्यतृतीया : भारतीय मूळ संस्कृतीचा हलोत्सव
जगात प्राचीन काळात नावाजलेली संस्कृती ही भारताची सिंधु संस्कृती होती. त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा मागमूस नव्हता. माणसाला माणूसकीने वागविणारी आमची मूळ संस्कृती होती. हयाच संस्कृतीला श्रमण संस्कृती म्हटले जाते. ही संस्कृती काळया आईला मानणारी कृषी संस्कृती होती. अशा ह्या संस्कृतीत निसर्गातील जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी यांचे ॠण व्यक्त केले जात असत. बळीराजा हा हल म्हणजे नांगर चालवितांना दिसतो. कृषी संस्कृतीचा बळीराजा वाहक होता. वरूण राजाच्या कृपेमुळे शेतीत पाऊसाने चैतन्य निर्माण होते म्हणून सुद्धा त्याची पूजा केली जात असे. सूर्याला सुध्दा देवाचे स्थान म्हणजे पूजनीय मानले जात असे. त्याचप्रमाणे भूमातेला जीवन जगविणारी अन्नपूर्णा मानली जाई. तिच्या कुशीत मानवाचा सारा संसार सामावलेला असायचा...ह्या कृषी संस्कृतीला सुगीचे दिवस आणणारा बळीराजा पुजला जात असे. अक्षय्यतृतीया हा सण मूळ भारतीय सिंधू संस्कृतीचा सण होय. हलोत्सव म्हणजे शेतीला नांगरुन बी रुजण्यास तयार करणारा सण..बुध्दकाळात सुध्दा कृषीला तेवढेच प्राध्यान्य होते. शाक्य व कोलीय हे सर्वच शेती करणारे लोक होते. त्यांच्या पूर्वजांचा पारंपरिक सण हा हलोत्सोव होता. भू -मातेला नमन करुन तिला कसण्याचा उत्सव होय. हाच उत्सव, सण अक्षय्यतृतीयाला साजरा केला जात होता. अक्षय्य म्हणजे न संपणारा. भूमाता ही न संपविणारा अन्नस्त्रोत होती. एक दाण्याचे हजार दाणे करण्याची किमया आजतागायत करत आलेली अन्नदायिनी.. जैन मुनी ॠषभदेव आपल्या अनेक महिन्याच्या उपवासानंतर हस्तीनापुर नगरीत येतात. तिथे श्रेयांस राजाने ॠषभदेव म्हणजे आदिनाथ भगवान यांना ऊसाचा रस देण्याचा दिवस. त्या दिवशी आपल्या उपवासाची सांगता ऋषभदेवाने केली. हा दिवस जैन लोक मानतात कारण दान देण्याचा हा योग्य दिवस होय. जैन धर्मात दान देण्याचा दिवस मानून ह्या दिवशी सत्पात्री दान देतात. चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा दिवस. हल नागरुन झाल्यावर सुपीक लागवड करण्याचा काळ म्हणजे अक्षयतृतीया होय. अक्षय्य म्हणजे न संपणारी व तृतीया म्हणजे तिसरा दिवस जो वैशाख महिन्यात म्हणजे मे महिन्यात शुक्ल तृतीयेला येतो. अमावश्येनंतरचा तिसरा दिवस होय म्हणून त्याला तृतीया म्हटले जाते. ह्या दिवसाला आखा तीज सुध्दा म्हटले जाते. अक्षय्य यासाठी म्हटला जातो की वरुण राजा पाऊस पाडतो त्याची खात्री असते. उदंड पिक येण्याचा अक्षय्य कालावधी असतो. पिकाचा क्षय होत नाही. पिक अक्षय्य ठरते तो दिवस होय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी करण्याची रीत पडली. त्यात नवीन सुरुवात, खरेदी, नवीन कार्य तडीस नेण्यास उत्तम दिवस मानला जाऊ लागला. आखा म्हणजे उभारणे होय. नवीन उभारण्याची तीज म्हणजे आखा तीज होय. आखा तीज चा पुढे अपभ्रंश होऊन आखाजी शब्द आला. या काळात बळीराजा भूमीला पेरण्याजोगे करतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गव्हाचे धान्ये पेरुन केली जाऊ लागली. कृषी रत्नाला थोडी उसंत मिळाली असते. त्यात तो बी पेरण्या नवीन सृजन करण्यास सज्ज असतो. ह्या सणाच्या काही अख्खायिका आहेत. मूळ संस्कृतीत मान्यता असलेले शिव पार्वती यांच्या पूजनाचा हा दिवस होय. ह्या दिवशी शंकर महादेव व पार्वती यांचे लोक पूजन करित. आर्य आल्यानंतर त्यांनी मूळ संस्कृतीची प्रतीक बदलली. प्रतिक्रांती करुन विष्णू व लक्ष्मी पूजनाने धन, संपत्ती, आरोग्य मिळण्यासाठी हा दिवस मानला जाऊ लागला. महाभारत नामक पुस्तकात श्रीकृष्ण युधिष्ठिर संवादात ह्या दिवशी दान केल्यास संपत्ती कमी नव्हता वाढत जाण्याचा संदेश दिला आहे. समतेचा विचार कृतीतून रुजविणारे बसवेश्वर यांचा जन्म दिवस ही ह्या दिवसाला मानला जातो. ह्या दिवशी परशुराम अवतरण काही लोक मानतात. जे वैज्ञानिकदृष्ट्या तर्कात बसत नाही. भविष्य वर्तविणारे लोक हा दिवस शुभमुहूर्त मानतात. त्यांचे अनुकरण करित लोक ह्या दिवशी सोने, चांदी, वाहन खरेदी करतात. धनाची पूजा करतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इतर राज्यात कमी प्रमाणात साजरा होतो.महाराष्टात देव व पित्तर यांचा तर्पण दिवस म्हणून साजरा केला जातो. खान्देशात सासुरवाशीण नवीन लग्न झालेल्या महिला आपल्या कामातून उसंत मिळते म्हणून माहेरला येतात. आपल्या जुन्या आठवणी ताज्या करतात. माहेरच्या ओलाव्याची ओल पुन्हा दिवाळीपर्यंत स्नेहाने टवटवीत ठेवतात. मस्त आंब्याचा रस, पुरणपोळी, आमटी, भजे, कुरडई याचा बेत घरोघरी असतो. तप्त उन्हाळ्यात मातीची घागर पूर्वजांची आठवण म्हणून भरली जाते. ऊन्हात लाहीलाही शमविणारी घागर पुन्हा ऊन्हाळया पर्यंत साथ देते. यानिमित्ताने आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. जरी तर्पणाने पूर्वज तृप्त होत नसले तरी त्यांची आठवण करणे ही कृतज्ञता आहे. आरोग्यास पुरक मातीची घागर भरणे ही वैज्ञानिक दृष्टीकोण जीवंत ठेवण्याची कृती आहे. माहेरला सासुरवाशीण येणे ही गतकाळातील आठवणींना व स्नेहवर्धन होण्यास उत्तम आहे. भारतात बरेच सण हे कृषी संस्कृतीची देणगी आहे. खान्देशात ह्या सणानिमित्त घराघरात मौसमी फळाचा आस्वाद घेतला जातो. खाद्य संस्कृती जपली जाते. भारतातील बळीराजा याला कवडीमोल किंमत दिली जाते. पिकवितो तो, कष्ट घेतो परंतु त्याच्या हक्काचा माल तो मर्जीने विकू शकत नाही. त्याला शेती परवडत नाही. मेहनत जादा परंतु त्याला मोल नाही. व्यापारी त्याच मालावर कोटयाधिश होतो आहे ही दयनीय स्थिती आहे. कित्येक शेतकरी आत्महत्या करुन मरत आहेत. जगाचा पोशिंदा जगविणे, त्याला नवनिर्मितीत हातभार लावणे, त्याच्या कष्टाला मोल देणे ही अक्षय्य तृतीया साजरी करणे होय..
एस. एच. भवरे
पत्रकार

