निवडणूक दहाला,शिक्षक गावाला
![]()

निवडणूक दहाला
शिक्षक गावाला
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे वातावरणात तापले आहे. राज्यातील तीन टप्प्यांतील मतदान सुरळीतपणे पार पडले आहे. चौथ्या व पाचव्या टप्प्यातील निवडणूक शिल्लक असतानाच मुंबई, कोकण व नाशिक मतदारसंघातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्याने वातावरणातील तापमानाप्रमाणे राज्यातील राजकीय वातावरण सुध्दा चांगलेच तापले आहे. शिक्षक मतदारसंघातून उभे राहिलेले शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे, शिक्षक सेनेचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर, भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार राजू बंडगर, अनिल बोरनारे यांच्याशी आमचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी संपर्क साधून अचानक अवकाळी पावसा प्रमाणे उभ्या ठाकलेल्या निवडणूक संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली असता सर्वच उमेदवारांना अनपेक्षित धक्का मिळाला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिक्षक सेनेचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून आपले मत व्यक्त केले आहे. यांच्या विरोधात शिक्षक भारतीचे सुभाष मोरे रिंगणात उतरलेले आहेत. ज. मो. अभ्यंकर यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असताना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत याचा फायदा त्यांना मिळेल तर दुसरीकडे तीन टर्म म्हणजे अठरा वर्षे शिक्षक आमदार असलेले कपिल पाटील यांनी आपली पुर्ण ताकद लावलेली आपले उमेदवार सुभाष मोरे शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटी व सुट्टीत गृहभेटी दैत प्रचार करत आहेत. यांनी सुध्दा निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी सुध्दा निवडणूक पुढे ढकलल्या जातील अशी माहिती दिली. तर भारतीय जनता पक्षाचे दुसरे शिक्षक नेते व इच्छुक उमेदवार राजू बंडगर यांनी निवडणूक कधीही होऊ दे आम्ही तयार आहोत अशी प्रतिक्रिया दिली. आमदार कपिल पाटील यांच्या मते शिक्षक गावाला गेलो असल्याने मतदानाच्या टक्केवारीत घट होईल पण आमचा उमेदवार विजयी होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. शिवनाथ दराडे यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच कलेंडर वितरित करून आता अंतर्देशीय पत्रा द्वारा प्रचारात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे धनंजय गजरे यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी लोकसभा निवडणूकीच्या बरोबरच आम्ही शिक्षक सेनेचा प्रचार करत आहेत यामुळे आमचा विजय निश्चित आहे असे मत व्यक्त केले. युवासेना अधिकारी रमेश वाजळे यांच्या मते महाराष्ट्रातील जनता युवा नेतृत्व आदित्य ठाकरे व उध्दव साहेब ठाकरे यांच्याकडे आकृष्ट झाल्याने मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विजय आपलाच आहे असे सांगितले. पदवीधर मतदारसंघातील उमेदवार दोन – तीन दिवसात आमचे नेते जाहीर करतील असे ज. मो अभ्यंकर यांनी सांगितले. तर भाजपचे उमेदवार निवडणूक तिसरा टप्पा पार पडल्यानंतर जाहीर होईल असे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. चुरशीच्या ठरणाऱ्या या निवडणूक संदर्भात बहुतेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. जर निवडणूक आयोगाने शिक्षक प्रतिनिधीच्या विनंतीला मान दिला तर ठीकच आहे नाहीतर शिक्षक गावाला व निवडणूक नावालाच होईल! असे मत वरीष्ठ शिक्षक विजय अवसरमोल सरांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे चार जुन नंबर होणारी ही निवडणूक लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचा ट्रेलर असणार आहे.

