महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ,”महामानवांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य..!”
![]()

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ,
“महामानवांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य..!”
मानवी इतिहासात “स्वातंत्र्य, समता ,बंधुता “या तत्त्वावर आधारित क्रांती प्रथम फ्रान्समध्ये झाली. राजेशाही जाऊन,” फॉर द पिपल ऑफ द पीपल अँड बाय द पीपल” चा नारा दिला गेला. जगभरात लोकशाहीच्या डंका वाजू लागला. हा काळ म्हणजे ब्रिटिश राज सत्तेचा सुवर्णकाळ होता .त्यांच्या राज्यावरील सूर्य कधीच मावळत नव्हता. आमच्या देशावर सुद्धा ब्रिटिश शासन होते. आम्ही गुलाम होतो. त्या अगोदर पेशवाईने सारी समाज व्यवस्था जातीपातीच्या विळख्यात ,शूद्र -अति शूद्रा च्या चक्रात ,अज्ञान अंधश्रद्धेच्या जात्यात भरडून काढली होती .त्यामुळे जेव्हा या देशावर ब्रिटिश शासन कर्ते राज्य करण्यासाठी आले. तेव्हा येतील समाजाने त्यांचे स्वागतच केले. “जळो ती पेशवाई “बाया बापडे असेच म्हणत होते .सारा समाज ,पाप- पुण्याच्या भोवऱ्यात ,उंच नीचतेच्या चक्रात अडकला होता. ब्राह्मण ,पुरोहित वर्गाला पैसे देऊन पुण्य विकत घेतले जात होते .येथील शेठ सावकार किड्या मुंग्यांना साखर घालत होते. हजारो ब्राह्मणांना “ब्राह्मण भोज” दिले जात होते परंतु शूद्रांसाठी तसेच अतिशुद्रासाठी पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होते.
सारी समाज व्यवस्था देव धर्माच्या नावाने नागविली जात होती. समाज जीवनाच्या तोल ढळला होता .तत्त्वांना ग्लानी आली होती. नीतीचा विपर्यास झाला होता. माणसाच्या पशु झाला होता .अशावेळी या समाज व्यवस्थेला सावरण्यासाठी कुणीतरी महात्मा जन्माला येणे आवश्यक होते.
समाज पुरुष वेदनेच्या वाटेने चालत राहतात. त्यांच्या वाटेला टाकीचे घाव येतात .कधी मान -अपमान येतो. पण ते झेलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते.
आणि म्हणूनच – साताऱ्या जिल्ह्यातील कटगुण गावी जन्मलेला आईविना हा पोरका मुलगा, फुले गुंफता गुंफता ,विचाराचा दोरा हातात घेऊन समाजाकडे पाहत होता.
तो पण समाज कसा होतात तर..?
विद्या विना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्त विना शूद्र खतले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले
सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी अगोदर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर केली पाहिजे. इथल्या समाजात प्रत्येक गोष्ट धर्माच्या नावाखाली ,देवाच्या नावाखाली केली जात होती. वैज्ञानिक दृष्टी शून्य होती. विचार करण्याच्या मनाचा कप्पा पूर्णतः बंद होता. लोकांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांच्या अंतकरणात शिरकावा करून त्यांना शिकवावं लागेल. हे महात्मा फुलेंनी जाणले होते. समाजात सत्य -अहिंसा- बंधुभाव या सदगुणांचा प्रसार करण्यासाठी ,व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवूण आणण्यासाठी शिक्षण महत्वाचे होते. त्यासाठीच महात्मा फुलेंनी ,सावित्रीबाईंना सोबत घेऊन सन १८४८ मध्ये भिडे यांच्या वाड्यात शूद्र आदि शुद्रांसाठी मुलींची शाळा प्रथम काढली.
मित्राच्या लग्नाच्या वरातीत शुद्र असल्याच्या कारणावरून अपमान झाला. हिंदू समाजातील जातीयतेचे ग्रहण सुटत नाही तोपर्यंत समतेच्या प्रकाश पडणार नाही .
“समते शिवाय स्वराज्य ही राजकीय आताषबाजी ठरेल.”
राजकीय गुलामगिरी जाऊन सामाजिक गुलामगिरी राहणार .हे महात्मा फुले जाणून होते.
त्यामुळे समाज जागृतीसाठी शिक्षण हे महत्त्वाचे हत्यार आहे . हे ते जाणून होते . त्याचबरोबर धर्माच्या नावावर पोट भरणाऱ्या पूरोहित वर्गाकडून या समाजाची सुटका करण्यासाठी त्यांनी प्रथमतः धर्माची नांगी ठेचली .साप मारायच्या असेल तर त्याच्या शेपटीवर न मारता त्याच्या तोंडावर प्रहार करावा म्हणजेच तो नामोहरण होईल. त्याचप्रमाणे त्यांनी धर्माचे स्तोम कमी करण्यासाठी पोथ्या- पुराने ही सामाजिक, विषमता पसरवणारी दलदल आहे. असे जाहीरपणे सांगितले. त्यांनी देव नाकारण्यापेक्षा पुरोहित वर्गाला नाकारले. अज्ञात- निर्मिकाला ईश्वरीय शक्ती मानले.
एकाच वेळी एकाच आघाडीवर लढावे लागेल तर हे सामाजिक विषमतेचे युद्ध आपण जिंकू शकणार नाही .हे ओळखून त्यांनी प्रत्येक चांगले विचार नुसते बोल घेवडेपणाने बोलून दाखवण्यापेक्षा प्रत्येक्ष कृतीत उतरवितले. सामाजिक परिवर्तनासाठी “सार्वजनिक सत्य धर्माची “स्थापना केली. त्या पद्धतीने ईश्वरीय शक्तीची पूजा ,लग्न -विधी, घरभरणी करण्यासाठीचा विधी कसा करावा ? हे ठरविले. विधवा ,परिपत्या, फसविलेल्या भगिनींसाठी अनाथालय काढले.
साहित्य हे समाज जीवनाचा अविभाज्य अंग आहे. हे पुढच्या पिढीसाठी आपल्या इतिहासाची प्रेरणास्थान आहे. त्यामुळेच त्यांनी साहित्य निर्मिती केली .”तृतीय रत्न” “छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा ,”ब्राह्मणाचे कसंब,” “गुलामगिरी “,”शेतकऱ्यांच्या आसूड” वगैरे साहित्याची निर्मिती केली.
महात्मा फुले तत्त्वाने भारले होते. तत्त्वपूर्तीसाठी ते समाजाला भीक घालत नव्हते. म्हणूनच धार्मिक गुलामगिरी विरुद्ध बंडाचे निशांण फडकविणाऱ्या महात्मा फुलेंनी वेद, मूर्ती पूजा ,पौराहित्य या धार्मिक बाबीवर वैचारिक हल्ला आयुष्यभर केला .त्यासाठी ते म्हणतात –
आता तरी तुम्ही शुद्रा भोंदू नका ।। ज्योतिबांचा ठोका ऐकुनिया ।।
असे आपले महामानव महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यभर चंदनासारखे झिजले.
माणसाला माणूसपण मिळवून देण्याच्या युद्धातील विजयाची पताका आयुष्यभर फडकवत राहिले .
- आणि ही पताका आता आपण सर्व या महामानवाचें अनुयायी होऊन अशीच पुढे फडकवत ठेवली तरच या “महात्मा फुले जयंतीला” काही अर्थ असेल..!
गोकुळ बागूल
21, टेलिफोन कॉलनी,
मु.पो.ता अमळनेर- 425401
जि.जळगाव.
मो. 9422276140

