पातोंडा येथील लघुमाहिजी देवीच्या यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ
![]()

पातोंडा येथील लघुमाहिजी देवीच्या यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ
पातोडा ता. अमळनेर प्रा.जितेश चव्हाण पातोंडासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व शासनाने ब वर्ग दर्जा प्रदान केलेल्या पातोंडा येथील लघुमाहिजी देवीचा यात्रोत्सव आज दि. २५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.
लघुमाहिजी देवीच्या यात्रोत्सवात खान्देशासह, गुजरात व मध्यप्रदेश मधील भाविक दर्शनाकरीता येतात. यात्रोत्सवास येत्या शुक्रवार पासून (ता. ६ जानेवारी) सुरवात होत आहे. परिसरातील हजारो भाविक यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतात. गावापासून उत्तरेस उंच कळस असलेले सुंदर लघुमाहिजी देवीचे भव्य पुरातन मंदिर आहे. मंदिरात अखंड दगडावर कोरीव सिंहावर आरूढ असलेली देवीची भव्य मूर्ती आहे. ही देवी आजही सप्तशृंगी देवीचे प्रतिरूप म्हणून ओळखली जाते. परिसरात नव्हे तर खानदेशात या देवीला फार महत्त्वाचे व मनाचे स्थान आहे.
आख्यायिका अशी फार प्राचीन काळात देवीच्या मंदिराच्या जागेवर एक मोठा वडाचा वृक्ष होता. या वडाच्या वृक्षाखाली उदासी नावाच्या तपस्वी महाराजांची पर्णकुटी होती. सभोवताली झाडाझुडपांसह पडीत शेतजमीन होती. या शेतजमीनीची मशागत करीत असताना एका शेतकन्याला त्रिशूळ आकाराच्या दगडाचे तीन सुरेख असे बाण सापडले. सप्तशृंगी देवीला सात बहिणी होत्या. त्यापैकी सर्वात लहान बहिणीचे नाव माहिजी देवी असे होते. ती सर्वांत लहान असल्याने या देवीला ‘लघुमाहिजी’ असे संबोधले जात असे. या देवीच्या हातात दगडाचा त्रिशूलाच्या आकाराचा बाण होता, या बाणालाच पूर्वी लघुमाहिजी म्हणून ओळखत असे, अशी आख्यायिका पर्णकूटीत वास्तव्यात असलेले उदासी महाराज सांगत असत. तेव्हापासूनच देवीला ‘लघुमाहिजी देवी’ म्हणून ओळखु लागले. असे देवीची सेवा करीत असलेले गुरव घराण्यातील सेवेकरी कृष्णा गालापुरे सांगतात.
अमळनेर मधील दानशूर प्रतापशेठजी यांनी देवीचे त्यावेळी सुंदर कळस असलेले मंदिर बांधून दिले आहे. आज मंदिराच्या आवारात परशुरामाचे मंदिर, त्याचप्रमाणे जहाजातून प्रवास करीत- असतानाचे राम, लक्ष्मण, सीतामाई व नावाड्या यांचा देखावा असलेले मंदिर बांधण्यात आले आहे. मंगल कार्यालयही आहे. मंदिराच्या बांधकामासाठी (कै.) जगन्नाथ वामनराव ठाकूर यांनी निधी जमा करून बांधकामाला अग्रक्रम देऊन मंदिर परिसराची शोभा वाढविली आहे. देवस्थानचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष दिनेश बिरारी, सचिव भुषण बिरारी, विश्वस्त प्रशांत बोरसे, दिपक सुर्यवंशी, सुरेश पालखे, रावण बाविस्कर, प्रविण पवार, धर्मदास चौधरी व नरेंद्र सैंदाणे आदींनी मंदिर देवस्थानास महाराष्ट्र शासनाचा तिर्थक्षेत्र योजनेअंतर्गत २००८ मधे क वर्ग तर २०२२ मधे ब वर्ग दर्जा प्राप्त होण्यात योगदान देत मंदिर परिसराची शोभा वाढविली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. ही यात्रा आठ ते दहा दिवसांपर्यंत सुरू असते. यात्रेत विविध खाद्य पदार्थ्यांच्या दुकानासह संसारोपयोगी वस्तूची दुकाने थाटलेली असतात. यात्रेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. नवस फेडण्यासाठी व दर्शनाकरीता परिसरातील भाविकांसह गुजरात व मध्यप्रदेश मधील भाविक येतात. मोठ्या प्रमाणावर येतात. रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. देवीचा मान म्हणून प्रत्येक गल्लीतून दरवर्षी तगतरावांची मिरवणूक काढली जाते.
प्रा.जितेश चव्हाण देशदूत प्रतिनिधी पातोंडा
बाईट –
“यात्रोत्सवात खान्देशासह, गुजरात व मध्यप्रदेश मधील भाविक दर्शनाकरीता येतात. माहिजी देवी पातोंडा सह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तिर्थक्षेत्र माहिजी देवी देवस्थानला शासनाने ब वर्ग दर्जा प्रदान केल्याने भाविकांमधे उत्साहाचे वातावरण आहे.” – दिनेश बिरारी, उपाध्यक्ष माहिजी देवी देवस्थान पातोंडा
फोटो – देवीचा फोटो

