कमी गुणांनी थांबवले नाही, जिद्दीने गाठली पीएच.डी.; डॉ. नेरकरांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

अमळनेर प्रतिनिधी
मंगरुळ, ता. अमळनेर : स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरुळ येथील माजी विद्यार्थी डॉ. संदीप काशिनाथ नेरकर (पीएच.डी. फिजिक्स) यांनी भौतिकशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदवी संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात डॉ. संदीप नेरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या संघर्षमय शैक्षणिक प्रवासातून अनमोल मार्गदर्शन केले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, “मी याच बेंचवर बसलो होतो, जिथे तुम्ही आज बसला आहात. २०१०-११ मध्ये मी याच शाळेतून दहावी उत्तीर्ण झालो. बारावीला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत; मात्र मी हार मानली नाही. भौतिकशास्त्राची आवड जोपासली आणि आज पीएच.डी.पर्यंत पोहोचलो.”
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मोबाईलचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. “मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करा, रोजच्या रोज अभ्यास करा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मेहनत, सातत्य आणि जिद्द ठेवली तर यश तुमचेच आहे,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय पाटील यांनी डॉ. संदीप नेरकर यांच्या शैक्षणिक वाटचालीविषयी सविस्तर माहिती सांगत त्यांच्या यशाचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, संस्थेच्या संचालिका श्रुती पाटील, संजय पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभुदास पाटील, राजेंद्र पाटील, शिक्षिका सुषमा सोनवणे, शितल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील तसेच वस्ती शाळेचे मुख्याध्यापक भटू पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विद्यालयाच्या वतीने डॉ. नेरकर यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
आपल्याच शाळेतील विद्यार्थी पीएच.डी.पर्यंत पोहोचल्याचा अभिमान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. डॉ. नेरकर यांच्या स्वागतावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपल्या ‘सिनियर’चे उत्स्फूर्त स्वागत केले.ह
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...