वॉशिंग्टन पोस्ट मॅगझिन’च्या मुखपृष्ठावर डॉ. दत्ता विघावे , सेवा, क्रिकेट आणि सामाजिक कार्याचा जागतिक गौरव; बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
![]()
वॉशिंग्टन पोस्ट मॅगझिन’च्या मुखपृष्ठावर डॉ. दत्ता विघावे
सेवा, क्रिकेट आणि सामाजिक कार्याचा जागतिक गौरव; बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
श्रीरामपूर प्रतिनिधी
: क्रिकेट, सामाजिक सेवा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि मानवतावादी उपक्रमांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेले ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, पंच, लेखक व समाजसेवक डॉ. दत्ता विघावे यांच्या बहुआयामी कार्याची दखल आता ‘वॉशिंग्टन पोस्ट मॅगझिन’च्या सप्टेंबर २०२६च्या विशेषांकाने घेतली आहे. या विशेषांकाच्या मुखपृष्ठावर डॉ. विघावे यांना मानाचे स्थान देण्यात आले असून, त्यांच्या कार्यप्रवासाचा सचित्र परिचय पाच पानांत मांडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुखपृष्ठावर “DR. DATTA VIGHAVE – A LIFE OF SERVICE, CRICKET AND GLOBAL RECOGNITION” असा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर “Turning Passion into a Greater Purpose” या संकल्पनेतून क्रिकेटची आवड, सामाजिक बांधिलकी आणि व्यापक मानवतावादी दृष्टिकोन यांचा संगम अधोरेखित करण्यात आला आहे. “सेवा निर्माण करते अधिक सक्षम उद्याची वाट” हा संदेशही विशेषत्वाने मांडण्यात आला आहे.
१५ हजारांहून अधिक कोरोना योद्ध्यांचा सन्मान
कोरोना महामारीच्या कठीण काळात निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या देशभरातील १५ हजारांहून अधिक कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम डॉ. विघावे यांच्या सामाजिक कार्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. डब्ल्यूसीपीएच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या या कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली असून, जागतिक संसदेचे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.
क्रिकेटशी आयुष्यभराची नाळ
डॉ. विघावे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या क्रिकेट क्षेत्रातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे. पंच, प्रशिक्षक, समीक्षक आणि लेखक अशा विविध भूमिकांत त्यांनी क्रिकेटशी नाते जपले. पिता-पुत्र जोडीने सलग अधिकृत क्रिकेट सामन्यांत पंचगिरी करण्याचा विक्रम त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. त्यांच्या नावावर विविध संस्थांकडून मान्यताप्राप्त सहा विश्वविक्रम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
क्रिकेटवरील त्यांचे लेखनही तितकेच व्यापक आहे. वृत्तपत्रे आणि विविध माध्यमांतून त्यांनी १३ हजारांहून अधिक क्रिकेटविषयक लेख लिहिले असून, नियम, पंचगिरी, खेळाडू, तंत्र, किस्से तसेच क्रिकेटविश्वातील श्रद्धा-अंधश्रद्धा अशा विविध विषयांना त्यांनी आपल्या लेखणीतून स्पर्श केला आहे.
पाच पुस्तके; पंचगिरीवर स्वतंत्र विचार
क्रिकेट विषयावरील त्यांच्या पुस्तकांनाही विशेष महत्त्व आहे. ‘क्रिकेट लॉज अँड क्लॉज’, ‘वादाच्या दुनियेतील पंचगिरी’, ‘अंपायरींग – अ थँकलेस बट नोबल जॉब’ आणि ‘क्रिकेटपटू – श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू?’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांनी क्रिकेटविषयक वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य केले आहे. पंचगिरीकडे केवळ निर्णय देण्याची भूमिका म्हणून न पाहता, ती “अत्यंत उदात्त पण कृतघ्नतेचे काम” असल्याचे त्यांनी आपल्या लेखनातून मांडले आहे.
शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी
ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांतही डॉ. विघावे कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. क्रिकेट क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना मानद डॉक्टरेट तसेच डी.लिट. यांसारख्या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून त्यांनी स्वतःहून जातीनिहाय आरक्षणाचा लाभ न घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.


अंतराळविषयक उपक्रमांमध्येही नावाची नोंद
डॉ. विघावे यांच्या कार्याचा आवाका क्रीडा व सामाजिक क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. नासा, रशियाच्या जिओस्कॅन उपग्रह प्रकल्प तसेच ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक मोहिमांमध्ये त्यांच्या नावाची मानद नोंद झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे क्रीडा, साहित्य आणि सामाजिक कार्याबरोबरच विज्ञान-शैक्षणिक उपक्रमांशी जोडले गेलेले त्यांचे नाव विशेष ठरते.
पद्मश्रीसाठी नामांकन; अनेक सन्मानांची शिदोरी
डॉ. विघावे यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले असून त्याची नोंदणी क्रमांक ५०६१३९६ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारत सरकारच्या टपाल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ उपक्रमातून त्यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच ‘एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी पिपल ऑफ इंडिया” या आउटस्टँडिंग १०० इंडियन्स च्या यादीत त्यांना स्थान मिळाल्याचे नमूद आहे.
‘वॉशिंग्टन पोस्ट मॅगझिन’चे मुखपृष्ठ ठरले नवा मानबिंदू
क्रिकेटचे मैदान, पंचगिरी, सातत्यपूर्ण लेखन, सामाजिक सेवा, शिक्षण, पर्यावरण आणि जागतिक स्तरावरील विविध उपक्रम अशा अनेक वाटांनी पुढे गेलेल्या डॉ. दत्ता विघावे यांच्या कार्यप्रवासाला ‘वॉशिंग्टन पोस्ट मॅगझिन’च्या मुखपृष्ठावर मिळालेले स्थान हा त्यांच्या मते महत्त्वाचा टप्पा आहे. ‘क्रिकेटपुरते मर्यादित नसलेले, तर सेवा आणि सामाजिक बांधिलकीला जीवनध्येय मानणारे व्यक्तिमत्त्व’ अशी प्रतिमा या गौरवातून अधोरेखित होत असल्याचे दिसून येते.
या गौरवाबद्दल विविध क्षेत्रांतून डॉ. दत्ता विघावे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या कार्यातील यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी आपले गुरुवर्य व मार्गदर्शक डॉ. सुधीरजी तारे सरांच्या आशीर्वादाला दिले आहे. “आजपर्यंतचा माझा प्रवास आणि मिळालेले यश हे डॉ. तारे सरांच्या मार्गदर्शन व आशीर्वादामुळेच शक्य झाले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
क्रिकेटची आवड, समाजसेवेची तळमळ आणि व्यापक उद्देशाने केलेले सातत्यपूर्ण कार्य यांची सांगड घालत डॉ. दत्ता विघावे यांनी उभारलेला प्रवास आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचल्याचे चित्र या गौरवामुळे स्पष्ट झाले आहे.

