पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हितासाठी सातत्यपूर्ण लढा आवश्यक : संदीप काळे अकोला येथील व्हॉईस ऑफ मीडिया कार्यालयाचे उद्घाटन
![]()
पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हितासाठी सातत्यपूर्ण लढा आवश्यक : संदीप काळे
अकोला येथील व्हॉईस ऑफ मीडिया कार्यालयाचे उद्घाटन
अकोला प्रतिनिधी
: पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हितासाठी लढा देणे आणि तो लढा सातत्याने सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि कृतिशील कार्यक्रम आखून संस्था म्हणून, संघटना म्हणून एक भूमिका घेणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारकडून आवश्यक ती भूमिका करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या हितापेक्षा पत्रकार आणि पत्रकारितेच्या हितासाठी कामाला लागले पाहिजे आणि पत्रकारितेतील विश्वास, प्रतिष्ठा आणि ताकद टिकवून ठेवली पाहिजे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.
अकोला येथे व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या संघटनात्मक बांधणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप काळे यांच्या हस्ते अकोला येथील व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बैठकीला साप्ताहिक विंगचे राष्ट्रीय मार्गदर्शक विनोद बोरे, जिल्हाध्यक्ष शंकर जोगी, यावेळी अरुण मोडक, रुबेन वाळके, महेंद्र डोंगरे, संजय वाड, श्रीकांत पाचकवडे, सुभाष इरुलकर, रामेश्वर जाधव, बाबा निंगरे, बी. एन. राठोड , मनोहर मानकर आणि संदीप देशमुख यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप काळे म्हणाले की, काळ झपाट्याने बदलत आहे आणि या बदलत्या काळाला योग्य दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून पत्रकार आणि पत्रकारितेसमोरील परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि बदलती माध्यमव्यवस्था यामुळे पत्रकारितेचे स्वरूपही बदलत आहे. या बदलत्या वातावरणाला सकारात्मक दिशा देण्याचे काम व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम सातत्याने करीत आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे, त्यांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
आज ८७ देशांमध्ये संघटनेचे जाळे उभे राहिले असून या विस्तारामागे सर्व प्रकारच्या पत्रकारांना संघटनेशी जोडण्याची भूमिका आहे. डिजिटल माध्यमांमध्ये काम करणारा पत्रकार असो, साप्ताहिक किंवा पाक्षिकाचा पत्रकार असो, वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही अथवा अन्य माध्यमांमध्ये काम करणारा पत्रकार असो, पत्रकारितेमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या प्रत्येकाला एकत्र आणण्याचे काम व्हॉईस ऑफ मीडियाने केले आहे. पत्रकार कोणत्या माध्यमात काम करतो यापेक्षा तो पत्रकारितेसाठी काय योगदान देतो आणि त्याच्या प्रश्नांच्या वेळी संघटना त्याच्या पाठीशी किती ताकदीने उभी राहते, हे महत्त्वाचे आहे. याच भूमिकेतून मोठे संघटनात्मक काम उभे राहिले असून आता या कामाला आणखी गती देण्याची गरज आहे, असे काळे यांनी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी केवळ चर्चा करून उपयोग नाही, तर त्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखले पाहिजेत. संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील पत्रकारांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. त्या समस्या संघटनेच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनासमोर मांडल्या पाहिजेत. गरज पडल्यास निवेदने, बैठका, पाठपुरावा आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करून पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा दिला पाहिजे. संघटना ही केवळ पद आणि प्रतिष्ठेसाठी नसून ती जबाबदारी स्वीकारण्याचे माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या पदाची जबाबदारी ओळखून प्रत्यक्ष कामाला लागले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
अकोल्यासारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये संघटनात्मक बांधणी आणि कृतिशील कार्यक्रमांना गती देण्यासाठी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या, संघटनात्मक बैठका, प्रशिक्षण उपक्रम आणि पत्रकारहिताचे विविध कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहेत. अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करून पत्रकारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पत्रकारितेतील विश्वासार्हता, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवणे ही प्रत्येक पत्रकाराची जबाबदारी आहे. बदलत्या काळात पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला सतत अपडेट ठेवले पाहिजे. डिजिटल पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावाचा अभ्यास करून नव्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. संघटना पत्रकारांना या बदलत्या काळात मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही संदीप काळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, याच महिन्यात अकोला येथे व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचा पदग्रहण सोहळा आणि कॅडर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. या कॅडर कॅम्पमध्ये अकोला आणि परिसरातील सुमारे ५०० पदाधिकारी, पत्रकार आणि सदस्य सहभागी होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष शंकर जोगी यांनी दिली. या कॅम्पच्या माध्यमातून संघटनात्मक कार्यपद्धती, बदलती पत्रकारिता, आधुनिक माध्यमांची आव्हाने, पत्रकारांचे प्रश्न आणि भविष्यातील कृतिशील कार्यक्रम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील संघटनात्मक विस्ताराला या नव्या कार्यालयामुळे अधिक गती मिळणार असून पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या सन्मानासाठी अधिक व्यापक पद्धतीने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
—————————
फोटो ओळ:
अकोला येथे व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या कार्यालयाचे उद्घाटन संदीप काळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
————



