दहावीतील ‘शिक्षक दिन’… आणि आयुष्यभराचा गुरुमंत्र!
![]()
दहावीतील ‘शिक्षक दिन’… आणि आयुष्यभराचा गुरुमंत्र!
विद्यार्थीदशेत ‘एक दिवसाचा अध्यापक’ झालो; नकळत त्याच भूमिकेने आयुष्याची वाटचाल शिक्षक म्हणून घडवली… २९ वर्षांपूर्वीच्या त्या अविस्मरणीय दिवसाच्या आठवणी आजही मनात ताज्या!
‘शिक्षक’ या शब्दाची फोड केली, तर शि – शिकवणारा, शीलवान; क्ष – क्षमाशील; क – कर्तव्यपूर्ती करणारा अशी त्याची अर्थपूर्ण व्याख्या करता येते. विद्यार्थ्यांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा, मातृहृदयी, आदर्शवादी, वाटाड्या, दीपस्तंभ, प्रेरणादाता, स्फूर्तीदाता, सामाजिक अभियंता, समीक्षक, अभिनेता अशी अनेक बिरुदे शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाला सार्थ ठरतात.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे स्थान अढळ असते. अशा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही दहावीत शिकत असताना एक आगळावेगळा उपक्रम केला होता. ‘नायक’ चित्रपटातील ‘एक दिन का मुख्यमंत्री’ या कल्पनेप्रमाणे आम्ही शिक्षक दिनी ‘एक दिन का अध्यापक’ झालो होतो. तेव्हा हातात घेतलेला खडू, फळ्यावर उमटवलेली अक्षरे आणि विद्यार्थ्यांशी जुळलेले ते नाते… आजही मनाच्या कोपऱ्यात तितकेच जिवंत आहे.
कदाचित नियतीने त्याच दिवशी माझ्या आयुष्याची दिशा निश्चित केली असावी. मला लाभलेल्या कल्पना सोनवणे बाई, सुखदेव जाधव सर, प्रा. एन. सी. पाटील, प्रा. एम. बी. निकम सर, प्रा. एम. जी. जगताप सर, प्रा. डॉ. वंदना महाजन बाई आदी शिक्षकांचे बोट धरत, त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत पुढे जाण्याचे परमभाग्य मला लाभले.
क्रांतिसिंहांच्या हस्ते लोकार्पित इमारतीत भरायची आमची शाळा
आमच्या प्र. डांगरी गावातील स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण झालेल्या ग्रामपंचायतीच्या टुमदार दुमजली इमारतीत आमची ‘न्यू इंग्लिश स्कूल’ भरायची. नावात ‘इंग्लिश’ असले, तरी ती मराठी माध्यमाची शाळा होती. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग या प्रशाळेत भरायचे.
सन १९९७-१९९८ हे आमच्या दहावीच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत भारलेले वर्ष होते. आमच्या वर्गात तब्बल ७५ विद्यार्थी होते. प्रत्येक जण आपापल्या परीने हुशार, उत्साही आणि हरहुन्नरी होता.
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून गावातील श्री. लक्ष्मण ठाकूर सर कार्यरत होते, तर आमच्या वर्गशिक्षकांची जबाबदारी श्री. गोविंद साळुंके सर सांभाळत होते. त्यांच्यासोबत पांडुरंग शिसोदे सर, सुखदेव जाधव सर, भगवान चौतमल सर, मधुकर मराठे सर, राजेंद्र सूर्यवंशी सर, लोटन चौधरी सर, पुरुषोत्तम सोनवणे सर, नितीन सनेर सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी म्हणून साळुंखे भाऊसाहेब, प्रयोगशाळा परिचर मधुकर शिसोदे, विश्वास साळुंखे, चव्हाण मामा आदींचे अमूल्य योगदान लाभत होते.
५ सप्टेंबर १९९७… आम्हीच झालो ‘सर’!
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा आमच्या शाळेतही होती. मात्र त्या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांनी या दिवसाला एक वेगळेच रूप दिले.


शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशीच तासिका आणि शिक्षकांचे वेळापत्रक तयार करण्यात आले. आणि अखेर तो दिवस उजाडला—शुक्रवार, ५ सप्टेंबर १९९७!
इयत्ता पाचवी ते नववीचे वर्ग सकाळच्या सत्रात भरले होते. आमच्या बाकावर बसणारा सहाध्यायी दीपक निकम याच्याकडे ‘मुख्याध्यापक’ पदाची धुरा सोपवण्यात आली. तर सहशिक्षकांच्या भूमिकेत मी, पवन पाटील, श्याम जाधव, स्वप्निल शिसोदे, विजय साळुंखे, उदय निकम, शीतल शिसोदे, सीमा पाटील आदी विद्यार्थी होते.
‘शिपाई’ म्हणून उत्तम बेलदार आणि किरण शिसोदे यांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या.
विशेष म्हणजे, साने गुरुजींनी ज्या राममंदिरात दलित बांधवांना आपल्या शुभहस्ते प्रवेश दिला होता, त्याच मंदिरात आमचे शिक्षक दालन तयार करण्यात आले होते. त्यामुळे त्या दिवसाला आमच्यासाठी भावनिक आणि ऐतिहासिक अशी दुहेरी किनार लाभली होती.
हातात खडू आला… आणि वर्गासमोर ‘सर’ उभा राहिला!
मला शिक्षकाची भूमिका ऐनवेळी देण्यात आली. मात्र मीही तयारीनिशीच होतो. त्या दिवशी इयत्ता पाचवीच्या वर्गात इंग्रजी आणि इयत्ता सहावीच्या वर्गात भूमिती या विषयांचे अध्यापन केले.
विद्यार्थ्यांना केवळ शिकवायचे नाही, तर त्यांना शिकवताना संवाद साधायचा, प्रश्न विचारायचे आणि त्यांच्याकडून उत्तरेही घ्यायची, याचा पहिलावहिला अनुभव त्यादिवशी मिळाला. अधूनमधून प्रश्न-उत्तरांची पेरणी केली. इरसाल पोरांना प्रसादही दिला!
इतर मित्रांनीही मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांचे अध्यापन केले. कुणी शिक्षक, कुणी मुख्याध्यापक, तर कुणी शिपाई बनले होते. पण त्या भूमिकांमध्येही आमच्या बालमनात शिक्षकांविषयीचा आदर अधिकच दृढ होत होता.
दिवसभराच्या या अनोख्या उपक्रमानंतर चहा-बिस्किटांची पार्टी झाली आणि तो दिवस अक्षरशः आनंदात गेला. त्या दिवशी आम्हा सर्वांचेच गगन ठेंगणे झाले होते!
‘दिवस हे पाखरासारखे…’
बघता बघता तो दिवसही सरला.
‘दिवस हे पाखरासारखे असतात,
भुर्रकन उडून जातात,
आणि उरतात फक्त पिसं आठवणींची…’
तब्बल २९ वर्षांपूर्वी विद्यार्थी दशेत शिक्षकाची भूमिका साकारणारा मी, पुढे भविष्यात शिक्षक होईन, असे तेव्हा स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र नियतीने वेगळेच काही ठरवले होते.
नकळत, त्याच शिक्षकाच्या भूमिकेने माझ्या आयुष्याला दिशा दिली आणि पुढे पालघर जिल्ह्यात मराठीचा शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.
आमच्या दहावीच्या वर्गातील अनेक मित्रही पुढे शिक्षकी पेशात आले. आमची ती बॅच खरोखरच हरहुन्नरी आणि आगळीवेगळी होती. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला.
आज विद्यार्थी शिक्षक दिन साजरा करतात… आणि मी भूतकाळात हरवून जातो!
आज मी स्वतः शिक्षक झालो आहे. शारदा विद्यालय, नेहरोली येथे विद्यार्थी जेव्हा शिक्षक दिन उत्साहाने साजरा करतात, तेव्हा माझे मन नकळत २९ वर्षे मागे जाते.
डोळ्यांसमोर तोच दुमजली शाळेचा परिसर उभा राहतो…
हातातला तो खडू आठवतो…
फळ्यावर उमटलेली अक्षरे आठवतात…
मित्रांचे ते निरागस चेहरे आठवतात…
आणि शिक्षकांच्या भूमिकेतला तो अविस्मरणीय दिवस पुन्हा एकदा मनात जिवंत होतो.
त्या एका दिवसाने मला केवळ ‘शिक्षक’ होण्याचा अनुभव दिला नाही; तर शिक्षक होण्याचे बीज माझ्या मनात रुजवले.
आज जेव्हा विद्यार्थ्यांच्या हातात खडू देतो, तेव्हा त्या खडूसोबत माझ्या दहावीच्या वर्गातील आठवणीही हातात येतात. तेव्हा जाणवते—काही दिवस संपत नाहीत; ते आठवणी बनून आयुष्यभर आपल्यासोबत चालत राहतात.
आणि म्हणूनच, माझ्यासाठी ५ सप्टेंबर हा केवळ शिक्षक दिन नाही; तो माझ्या आयुष्याला शिक्षकत्वाची दिशा देणारा, माझ्या विद्यार्थी जीवनातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय दिवस आहे.
— लेखक : ललित पाटील
सहशिक्षक, शारदा विद्यालय, नेहरोली
भ्रमणध्वनी : ९२०९५१६५३५

