ज्ञान आणि जीवनकलेचे मंत्र देऊन अस्तास गेलेले एक कर्मयोगी…स्व.डी.वाय.पाटील..!*
![]()
*ज्ञान आणि जीवनकलेचे मंत्र देऊन अस्तास गेलेले एक कर्मयोगी…स्व.डी.वाय.पाटील..!*
पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि विविध क्षेत्रात कार्यप्रवण राहून कौटूंबिक आणि सामाजिक जीवनातील आपल्या कार्याच्या क्षमतेप्रमाणे स्मृती कायम ठेवत या जगाचा निरोप घेत असतो. मनुष्याची आयुष्यातारा ही जन्म आणि मृत्यू या दोन बिंदुंना जोडलेली असते.आयुष्याच्या कृतार्थ प्रवासात जन्म हा त्याचा शुभारंभ तर मृत्यू हा त्याच्या मुक्कामाचा या प्रवासातील शेवटचा बिंदू असतो.अनादी कालापासून समुह जीवनाचे महत्व जाणणाऱ्या बहुतेकांनी सामाजिक जीवनातील यथार्थ प्रवासाला अधिक कृतार्थ ठरविण्याचे प्रयत्न केलेले असतात. अशा व्यक्ती किती वर्ष जगल्यात यापेक्षा कशाप्रकारे जगल्यात या कर्मप्रदान मुल्यमापनानेच त्या मनुष्याच्या जीवनाची सफलता अधोरेखित होत असते. स्मृतींचा कर्म इतिहास हा त्या व्यक्तीला अजरामर,अमर ठरवत असतो.त्यांचे अफाट कर्तृत्वाचे ज्वलंत आदर्श हे पुढील पिढ्यांना प्रेरणादायी आदर्श ठरत असतात.
असेच ज्ञानाच्या प्रखर प्रकाशात देशातील हजारो तरूणांची आयुष्ये प्रकाशमान करण्याचं अद्वितीय गौरवशाली जीवन जगणाऱ्या महान कर्मयोग्यांच्या कृतार्थ आयुष्याचा प्रवास नियतीने थांबवला….आणि *शिक्षणमहर्षी,पद्मश्री,माजी राज्यपाल डॉ.डी.वाय पाटील उर्फ ज्ञानदेव यशवंत पाटील या सर्वांच्या हृदयातील दादासाहेबांचे कोल्हापूरमध्ये दि.०४ ऑगस्ट २०२६ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.* या घटनेने अख्ख्या महाराष्ट्रात शोककळा तर पसरलीच,परंतू त्यांच्यासोबत देशातील आणि परदेशातील स्नेही मित्र, विद्यार्थी,त्यांनी उभारलेल्या असंख्य संस्थांमधील सेवक,आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सामान्न्यजणांची आणि कोल्हापूरवासियांची मने अक्षरस:हेलावून गेली.अशी माणसं लवकर जाऊ नयेत असं सगळ्यांनाच वाटते,परंतू नियतीच्या समोर कुणाचंच काहीही चालत नसते.त्यांच्या निधनामुळे त्यांचे पूत्र डॉ.संजय पाटील,डॉ.विजय पाटील,माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, डॉ.अजिंक्य पाटील त्यांच्या सर्व बहिणी,भावंडं,नातवंड आणि कुटूंबिय,आप्तस्वकीय, दु:खी झाले.हे परिवार म्हणून सत्त्य असलं तरी त्यांचेसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश सुध्दा हळहळला..!
*दि.२२ आक्टोंबर १९३५ रोजी स्व.ज्ञानदेव यशवंत पाटील उर्फ डी.वाय.पाटील यांचा जन्म झाला होता.* कोल्हापूर येथे कसबाबावडा ही त्यांची जन्मभूमी,आणि नंतर विश्वव्यापक संकल्पना घेऊन चालणाऱ्या स्व.दादासाहेबांची फक्त कोल्हापूरच नव्हे,तर संपूर्ण महाराष्ट्र ही कर्मभूमी होती.परंतू त्यांचा ज्ञान प्रकाशाची प्रतिबिंब देशात फरदेशातही पसरलेली आहेत. आज महाराष्ट्रात आणि ईतरत्र डी.वाय.पाटील विद्यापीठांच्या वैद्यकीय,अभियांत्रीकी आणि ईतर अनेक शाखांमधून दर्जेदार शिक्षणपध्दतीने अग्रेसर ठरलेल्या त्यांच्या १७० च्या जवळपास संस्था आहेत. या महाकाय शृंखलेचे शिल्पकार स्व दादासाहेबांच्या गगणभरारीतील अफाट कर्तृत्वाचा अमर ठरणारा हाच अविस्मरणीय इतिहास आहे.त्यांनी अमेरिकेच्या अॕरिझोना विद्यापीठातून तत्वज्ञान या विषयात पिएचडी करून डॉक्टरेट मिळवली होती.राज्यपाल होण्यापूर्वी आणि नंतरही देशात आणि जागतिक पातळीवर असंख्य पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले होते. शिक्षण क्षेत्राशिवाय साहित्य, समाजकारण, कृषी,ज्ञान,प्रगत तंत्रज्ञानाच्या व ईतर अनेक क्षेत्रात त्यांच्या कार्याचे अविस्मरणीय ठसे उमटलेले आहेत.असे म्हणतात की ” *ज्ञानाचा दिवा हा स्वत:पुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील अंध:कार दुर करण्यासाठी वापरला पाहिजे.तिच खरी मानवतावादी समाजसेवा असते.
युवावस्थेपासून सामाजिक प्रश्नांबाबत प्रखर संवेदनशिलता त्याच्यामध्ये होती.वडील आणि आजोबांच्या सामाजिक विचारांच्या वारशामुळे तर ती अधिक प्रगल्भ होत गेली.त्यामुळेच *”ज्ञाधाधिनं जगत् सर्वम्”* या वास्तव सत्याला जीवनात वाहून घेत आपले *”ज्ञानदेव”* हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ केले.तारूण्यात क्रिडा क्षेत्रात रूची आणि सामाजिक विकासाची दृष्टी होती.घराण्यात संत सहवास आणि आध्यात्मिक विचारांचा वारसा होताच.त्या काळात महाविद्यालयीन, उस उत्पादक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी आणि अनेक आंदोलने त्यांनी केली.सामाजिक विकास आणि जनकल्याणाचा ध्यास असल्याने ती स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांनी आपले संघटनकौशल्य सिध्द केले.प्रश्न तडीस नेण्याची आक्रमकता आणि संघर्ष करण्याच्या क्षमतांनी ते एक प्रभावी लोकनेते ठरले.सलग २० वर्ष पन्हाळा बावळा मतदार संघाचे आमदार होते.राजकारणात ते कॉंग्रेस पक्षाचे नेते होते.सकारात्मक दृष्टीकोण,पक्षाप्रती निष्ठा आणि कर्तव्य भावनांची प्रामाणिकता असल्याने यशवंतराव चव्हाण,शंकरराव चव्हाण,वसंतदादा पाटील,सुधाकरराव नाईक,शरद पवार या व अशा अनेक दिग्गज नेत्यांना त्यांनी मनापासून साथ दिली,सहकार्य केले.त्यांच्या हृदयातील प्रेमभावना, विचारांची सकारात्मकता,शुभचिंतनाचा दृष्टीकोण आणि विधायक विचारांनी ते मैत्रीच्या दुनियेतील *”दिलदार राजे”* होते.त्यांचा पक्ष कॉंग्रेस असला तरी पक्षीय राजकारणापलिकडे सामाजिक विकासासाठी त्यांनी समतावादी भुमिका घेतल्या.
अनेकांना राजकारण ,समाजकारणात उच्चस्थानी बसविण्यात *”किंगमेकर”* म्हणून त्यांचा सिंहाचा वाटा होता.विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मान मिळवून देण्यात त्यांच्या मदती होत्या.वसंत कानेटकरांना पद्मश्री मिळाली तेव्हा आम्ही सोबत राष्ट्रपती भवनात होतो.हरियाणातील भोंडशीच्या आश्रमातील देवीच्या मंदिरातून जंगलात दुरून *”आओ डी.वायजी…आओ”* म्हणत आवाज देणाऱ्या माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासारख्या राजमान्य, गणमान्य थोर व्यक्ती त्यांचेवर किती जीवापाड प्रेम करतात,हे आम्ही नेहमी पाहत होतो.कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून आलेल्या अनेक गरजू व्यक्तींना औषधोपचार, आरोग्यसेवेसाठी आणि अनेक आर्थिक मदतीतही ते अग्रेसर होते आजारी व्यक्तींना मुंबईतील नामांकित हिंदुजा,लिलावती सारख्या हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यांची बिलं चुकती करण्यापासून त्यांच्या व्यवस्था पाहण्याचा स्व.दादासाहेबांचा सेवाधर्म सांभाळण्याची माझी जबाबदारी होती.स्वत:चं आजारपण विसरून ते कामाला लागत.
ते आमदार राहिले,मंत्रीपद मिळालं नाही.परंतू शिक्षणक्षेत्राच्या शेवटच्या पर्वात मात्र ते त्रिपूरा,बिहार आणि पश्चिम बंगाल या ३ राज्याचे राज्यपाल होते.या काळात मानधन म्हणून फक्त १ रूपया घेण्याचा त्यागमय विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता.राजकीय प्रवाह कालांतराने त्यांना आवडला नाही.म्हणूनच त्यांनी राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे समाजातील एक शिक्षणप्रेमी शिक्षणमहर्षी हे कार्य राजकारणापेक्षा खूप मोठे ठरले. कॉंग्रेसशिवाय ईतर पक्षातही त्यांचे मित्र होते.स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी अंदाजे १९९२ च्या आसपास ज्यावेळी शिवसेना प्रमुखपद सोडण्याचा निर्णय घेतला होता,त्यावेळी ते अज्ञातवासात आहेत म्हणून सांगीतलं जात होतं.परंतू त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नव्हता याची जाणीव आदरणीय दादासाहेबांना झाली.म्हणून त्यांनी त्वरीत मला एक पत्र तयार करायला सांगितले.*”आपण घेतलेल्या निर्णयाने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान ठरू शकते.म्हणून हा निर्णय मागे घ्यावा”* या आशयाचे ते पत्र होते.ते घेऊन मी मातोश्रीमध्ये स्व.बाळासाहेबांना त्यावेळी भेटलो होतो.
१८९० ते १९९४ च्या दरम्यान स्विय सचिव म्हणून मी त्यांच्या सेवेत कार्यरत होतो.या दरम्यान त्यांचे बौध्दीक निर्णय,काम करण्याची, शासन,प्रशासन आणि सामाजिक जनसंपर्क सांभाळण्याच्या पध्दती मला जवळून पाहता आल्यात.चालता चालता सह्या करून अनेकांना मोकळं करत राहणारी त्यांची कामाची गती होती.नेरूळच्या कॉलेजमधून चेक आणि फाईली घेऊन येणाऱ्यांना मध्येच गाडीत बसवायचं. चालत्या गाडीत सह्या व्हाच्या.पुढे त्यांना उतरवून टॅक्सीने जायला सांगायचं.त्यावेळी “पैसे आहेत ना?” हे काळजीने विचारण्यासही दादासाहेब कधी विसरत नव्हते. सामान्यातल्या सामान्य माणसांची ही त्यांना चिंता होती.एवढ्या मोठ्या प्रचंड कामांमध्ये इतकं लक्ष असतं हे त्यांच्याबाबतित एक आश्चर्यकारक सत्त्य होतं.*”सपने वही सच होते है,जिसमे जान होती है,खाली पंखो से कुछ नहीं होता.सही उडान बुलंद हौसलो मे ही होती है.”*
त्यांची भाषणे म्हणजे ज्ञान आणि प्रतिभेचा अपूर्व संगम होता.त्यातून जीवनकलेचे धडे होते.मानसिक शक्तींचा विकास करण्याचे तंत्र,चेतन आणि अचेतन मनाच्या अवस्था, व्यक्तीं – व्यक्तींच्या सुप्त शक्तींचा विकासासाठी उपयोगाचं तंत्र, हे त्यांच्या मार्गदर्शनाचे अनमोल विषय असायचे. नृसिंहवाडीचे महादबा पाटील त्यांचे गुरू होते.आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक संत विभूती त्यांचेकडे येत होत्या.शेगांवीच्या संत गजानन महाराजांचे ते निस्सिम भक्त होते.त्याकाळात शेगांवी आल्यानंतर वझेगाव येथील परमहंस रामचंद्र महाराजांकडे पण आले होते.तिथे स्वामी जोमानंद महाराजांमुळे माझी व दादासाहेबांनी भेट झाली होती. पत्रव्यवहार,भेटी,गाठींच्या वेळा,फोन संपर्क आणि मंत्रालयीन कामे ह्या स्विय सचिव म्हणून माझ्या त्यांचे सेवेतील भुमिका होत्या.मी माझ्या कारणाने नोकरी सोडल्यावरही ते माझ्यावर नाराज झाले नाही.उलट भेटी,गाठी सोबत जेवण,चर्चा असे कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू होते.उत्कृष्ट कामाचं प्रमाणपत्र घेऊन तर बाहेर पडलोच होतो.परंतू सरपंच झाल्याचे कुणी सांगीतले आणि मला अभिनंदन पत्र पोहचले.गर्दीतून सामान्य माणसालाही ओळखून जवळ बोलावणे,त्यांची व्यवस्था,आदर आतिथ्याकडे लक्ष देणे या प्रेमळ वागणुकीचं खानदानी वैभव त्यांचेकडे होतं.
त्या काळात मोबाईल नव्हते.मला नंबर लावायला सांगत,आणि स्वतःच फोन लाऊन मोकळे झालेले असायचे.एवढे नंबर मुखोद्गत ठेवत आणि व्यापक परिचय सांभाळणारी व्यक्ती म्हणजे नियतीने समाजासाठी पाठवलेले अतेंद्रिय शक्तीचे वाहक आणि प्रचंड उर्जाशक्तीचे साधकच असतात.त्यांच्या मानसिक शक्तींच्या प्रभावाची अनेक उदाहरणे मी प्रत्यक्ष अनुभवलेली आहेत.*”या गाडीने प्रवास करू नका,या पासून धोका आहे”* असं एका महाराजांना कळव म्हणून मला त्यांनी सांगीतलं होतं.मला सांगण्यात उशीर झाला.तीच गाडी झाडावर धडकून त्याच महाराजांचा अपघात झालेला आहे.पायावर निभावलं होते.अफाट उर्जेने गतिमान काम करून शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रात कार्याचा क्रांतीकारी इतिहास रचणारे एक कर्मयोगी कर्मगीता सांगून आपल्यातून निघून गेले.अशी माणसं अपवादानेच जन्माला येत असतात.ते ज्ञान,जीवनकला,विकास आणि मानवतेचा प्रकाश दाखवून अस्ताला जाणारे परंतू कर्मवादाने अमर ठरलेले ऐतिहासिक तारे असतात….आदरणीय स्व.दादासाहेबांना परमेश्र्वर चिरशांती देवो,त्यांच्या कुटूंबियांना हे दु:ख पेलण्याचे सामर्थ्य देवो हिच प्रार्थना आणि भावपूर्ण श्रध्दांजली…!🙏🌹❤️🌹🙏


*संजय एम.देशमुख*
*ज्येष्ठ पत्रकार,अकोला*
*संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष*
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ.*

