ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह जल्लोषी स्वागत!,  गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगारात नटल्या अमळनेरच्या लेकी; पारंपरिक खेळांनी जागवल्या माहेरच्या सुखद आठवणी
1 min read

ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह जल्लोषी स्वागत!, गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगारात नटल्या अमळनेरच्या लेकी; पारंपरिक खेळांनी जागवल्या माहेरच्या सुखद आठवणी

Loading

ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह जल्लोषी स्वागत!

गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगारात नटल्या अमळनेरच्या लेकी; पारंपरिक खेळांनी जागवल्या माहेरच्या सुखद आठवणी

अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणात पाऊल ठेवताच बालपणीच्या आठवणींचा सुगंध दरवळतो… मैत्रिणींच्या गप्पांना पुन्हा रंग चढतो… झोक्यावरची गाणी, हातांवरील मेंदी आणि बांगड्यांची खणखण मनाला पुन्हा त्या जुन्या दिवसांत घेऊन जाते. अशाच माहेरच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आनंदोत्सवाला अमळनेरमध्ये दिमाखात सुरुवात झाली.

‘माहेरचा पारिजात’ या अनोख्या स्नेहमेळ्याने शनिवारी, दि. २९ ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिर परिसर माहेरवाशिणींच्या हास्य-विनोदाने आणि उत्साहाने फुलून गेला. अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित हा तीन दिवसीय स्नेहमेळा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत रंगणार असून, मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

औक्षण, गजरा अन् मोत्यांच्या दागिन्यांनी झाले जंगी स्वागत!

सकाळी नऊ वाजता माहेरवाशिणींचे हळद-कुंकवाने औक्षण करून ढोल-ताशांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. प्रत्येक माहेरवाशिणीला मोत्यांचे दागिने आणि सुगंधी गजरे भेट देण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने माहेरच्या लेकींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

यानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिक महाआरती करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता सर्व माहेरवाशिणींनी एकत्र येत आपला स्वयंपरिचय करून दिला. त्यानंतर कु. आकांक्षाताई, मयुरीताई आणि दीप्तीताई यांनी माहेरवाशिणींच्या हातांवर आकर्षक मेंदी रेखाटली. सौ. पूजाताई मोराणकर यांनी बांगड्यांसह सौभाग्याचे वाण देऊन या स्नेहमेळ्याच्या आनंदात आणखी भर घातली.
दुपारी सव्वाबारा वाजता सर्व माहेरवाशिणींनी श्री मंगळग्रह देवांचा सामूहिक महाअभिषेक केला. त्यानंतर खानदेशच्या खास पाहुणचाराची चव देणाऱ्या पुरणपोळीच्या भोजनाचा आस्वाद घेत सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला.

सागरगोटे, काचा-कवड्या अन् आट्यापाट्यांनी जागवलं बालपण!

दुपारी दोन ते तीन या वेळेत सागरगोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, उभा खो-खो आदी पारंपरिक खेळांनी माहेरच्या अंगणातील बालपण अक्षरशः पुन्हा जिवंत झाले.
झोक्यावर बसून गाणी म्हणताना माहेरवाशिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. गप्पा, हास्य-विनोद आणि जुन्या आठवणींनी मंदिर परिसरातील वातावरणाला जणू माहेरच्या अंगणाचेच रूप आले.
सायंकाळी साडेपाच वाजता सामूहिक चहापानानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिक सायंआरती झाली.

कर्तृत्ववान माहेरवाशिणीचा विशेष सन्मान

यानंतर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, शहर विकास आघाडीच्या गटनेत्या सौ. जयश्रीताई पाटील आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेरच्या माहेरवाशिणी तथा सहाय्यक कर निरीक्षक सौ. हर्षाताई साळुंखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यानंतर सामूहिक मंगळागौरच्या खेळांनी स्नेहमेळ्याला आणखी रंगत आली. रात्री उशिरा सामूहिक भोजनानंतर पहिल्या दिवसाची आनंददायी सांगता झाली.

नऊवारी साडी, नथ अन् पारंपरिक दागिन्यांत सजली मंगळागौर

परंपरेचा जागर आणि उत्साहाचा जल्लोष अशा वातावरणात सायंकाळी माहेरवाशिणींनी मंगळागौर साजरी केली. मंगळागौरीची भव्य आरास करण्यात आली होती. अस्सल मराठमोळी नऊवारी साडी, नथ आणि पारंपरिक दागिन्यांचा साज करत माहेरवाशिणींनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवले.
फुगडी, झिम्मा, गिरकी आणि विविध पारंपरिक खेळांमध्ये माहेरवाशिणींनी मनमुराद आनंद लुटला. हास्य-विनोद, उत्साह आणि स्नेहाने भारलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.

स्नेहमेळ्याचा उद्देशच ‘माहेरपण’ जपण्याचा!

माहेरच्या अंगणात पुन्हा एकदा बालपण अनुभवता यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळ्या गप्पांची मैफल रंगावी, या भावनेतून ‘माहेरचा पारिजात’ स्नेहमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःचे बालपण कुठेतरी मागे पडलेल्या अमळनेरच्या लेकींना या निमित्ताने पुन्हा एकदा माहेरची ऊब अनुभवता येत आहे.
या उपक्रमासाठी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे आणि कोशाध्यक्षा प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

उदय रविवार, दि. ३० ऑगस्टचे आकर्षण

सकाळी ६ वाजता चहापान, ८.३० वाजता नाश्ता, ९.१५ वाजता नीम (ता. अमळनेर) येथील कपिलेश्वर मंदिराकडे भेटीसाठी प्रस्थान व तेथेच भोजन. दुपारी ३ वाजता श्री मंगळग्रह मंदिरात वामकुक्षी व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजता चहापानानंतर प.पू. संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेत भुलाबाई व गौराई उत्सवांतर्गत भोफ्लडल्याची गाणी, झोके व खेळ होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती, रात्री ९.३० वाजता भोजन आणि त्यानंतर शेकोटी कार्यक्रमांतर्गत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रंगणार आहे. रात्री १०.३० वाजता विविध खेळांनंतर विश्रांती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *