प्रभाग १६ मध्ये नाला अरुंद झाला, पुराचा धोका वाढला! अतिक्रमणाविरोधात भूषण भदाणे आक्रमक
![]()
प्रभाग १६ मध्ये नाला अरुंद झाला, पुराचा धोका वाढला! अतिक्रमणाविरोधात भूषण भदाणे आक्रमक
अमळनेर प्रतिनिधी) : ३१ जुलैच्या अतिवृष्टीने अमळनेर शहरातील अनेक भागांना पुराचा तडाखा बसल्यानंतर आता नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहावर झालेल्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधून जाणाऱ्या पिंपळे नाल्याची नैसर्गिक रुंदी कमी करून काही ठिकाणी अनधिकृत भराव व बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी केला आहे. नाल्याचा प्रवाह अरुंद झाल्यास भविष्यात पावसाचे पाणी अडून परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात जळगाव येथे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची भेट घेऊन भूषण भदाणे यांनी निवेदन सादर केले. पिंपळे नाल्याची महसूल विभाग, नगरपरिषद आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत संयुक्त मोजणी करून नाल्याची मूळ हद्द व नैसर्गिक रुंदी निश्चित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नवकार सिटी, अष्टविनायक नगर, संत प्रसाद नगर आणि गुरुकृपा कॉलनी परिसरात नाल्यात भराव टाकून त्याची रुंदी कमी करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी नाल्याचा प्रवाह केवळ सुमारे तीन मीटरच्या अरुंद चॅनेलमधून ठेवण्यात आल्याचेही भूषण भदाणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास त्याचा नैसर्गिक निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आता प्रशासनाकडून या तक्रारीवर कोणती भूमिका घेतली जाते आणि नाल्याची संयुक्त मोजणी करून कथित अतिक्रमणांची वस्तुस्थिती कधी स्पष्ट केली जाते, याकडे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
३१ जुलैच्या पुरानंतर प्रश्न पुन्हा ऐरणीवर
३१ जुलै २०२६ रोजी अमळनेर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर नाल्यांच्या प्रवाहातील अडथळे आणि कथित अतिक्रमणांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली असता नागरिक व व्यापाऱ्यांनी नाल्याच्या अरुंदीकरणामुळे पाण्याचा निचरा प्रभावित होत असल्याची तक्रार केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा न करता प्रशासनाने नाल्याची प्रत्यक्ष मोजणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी भूषण भदाणे यांनी केली आहे.
महसूल, नगरपरिषद अन् भूमी अभिलेख विभागाची संयुक्त मोजणी करा
पिंपळे नाल्याची मूळ हद्द निश्चित करण्यासाठी महसूल विभाग, अमळनेर नगरपरिषद आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नियुक्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोजणीत अनधिकृत भराव किंवा बांधकाम आढळल्यास ते तातडीने हटवावे आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच तहसीलदारांचा स्थगिती आदेश असतानाही अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाचीही प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी भूषण भदाणे यांनी केली आहे.
सात दिवसांत कारवाई करा, अन्यथा उपोषण
पिंपळे नाल्याची प्रत्यक्ष मोजणी, पंचनामा आणि आवश्यक कारवाई सात दिवसांच्या आत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मुदतीत प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई न झाल्यास प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा इशारा भूषण भदाणे यांनी दिला आहे.

