पातोंडा शाळेत राखी निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ,विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली प्रोत्साहनाची शाबासकी; गुणवंतांसह सर्व सहभागी स्पर्धकांचा गौरव
![]()
पातोंडा शाळेत राखी निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली प्रोत्साहनाची शाबासकी; गुणवंतांसह सर्व सहभागी स्पर्धकांचा गौरव
अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पातोंडा येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी यमुताई अवकाळे, अध्यक्ष धनदीप बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आकर्षक राखी निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि कलाकौशल्याचा वापर करत विविध रंग, आकर्षक सजावट व कल्पक साहित्याचा उपयोग करून सुंदर-सुंदर राख्यांची निर्मिती केली.
राखी निर्मिती स्पर्धेत शाळेतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. पारंपरिक राखीला सर्जनशीलतेची जोड देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविधरंगी आणि आकर्षक राख्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हस्तकौशल्य, कल्पनाशक्ती, सौंदर्यदृष्टी आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत झाली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख महेश पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता लोहारे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगपेटी, कंपास तसेच सचित्र बालमित्र पुस्तके अशी उपयुक्त व ज्ञानवर्धक बक्षिसे देण्यात आली. या बक्षिसांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
राखी निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक मयुरी पाटील, द्वितीय क्रमांक गणेश दत्तात्रय संदानशिव, तर तृतीय क्रमांक रिषभ राहुल लांबोळे यांनी पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक राजेश्वरी पारधी हिला देण्यात आले. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचाही गौरव करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम शालेय जीवनात अत्यंत महत्त्वाचे असून, त्यातून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाबरोबरच विविध कला व कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळते. राखी निर्मिती स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘स्वतः तयार करण्याचा आनंद’ आणि ‘सर्जनशीलतेतून व्यक्त होण्याचा अनुभव’ घेतला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती प्रतिभा पाटील, सौ. छाया इसे, श्रीमती सुषमा तायडे, श्री. सुनील सोनवणे आणि श्रीमती वैशाली बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना देणारे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे असे उपक्रम शाळेत सातत्याने राबविले जावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

