मुलांकडे दुर्लक्ष, संपत्तीच्या हव्यासातून वृद्धाश्रम वाढत आहेत -विजय लुल्हे,  निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; अनुभव आणि ज्ञान समाजासाठी देण्याचा नवा प्रारंभ — ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चार ज्येष्ठांचा हृद्य सत्कार
1 min read

मुलांकडे दुर्लक्ष, संपत्तीच्या हव्यासातून वृद्धाश्रम वाढत आहेत -विजय लुल्हे, निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; अनुभव आणि ज्ञान समाजासाठी देण्याचा नवा प्रारंभ — ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चार ज्येष्ठांचा हृद्य सत्कार

Loading

मुलांकडे दुर्लक्ष, संपत्तीच्या हव्यासातून वृद्धाश्रम वाढत आहेत : विजय लुल्हे

निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; अनुभव आणि ज्ञान समाजासाठी देण्याचा नवा प्रारंभ — ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चार ज्येष्ठांचा हृद्य सत्कार

अमळनेर प्रतिनिधी : “मुलांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रॉपर्टी वाढविण्याचा हव्यास हाच वृद्धाश्रमांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे,” असे परखड प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष विजय लुल्हे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा अनौपचारिक व आत्मीय सत्कार करण्यात आला. यावेळी लुल्हे बोलत होते.
सत्काराची सुरुवात कुटुंबीयांकडून ज्येष्ठांचे अग्रपूजन व औक्षण करून झाली. त्यानंतर शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन विजय लुल्हे यांच्या हस्ते ज्येष्ठांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, अर्थपूर्ण जीवनाचा नवा प्रारंभ”

मार्गदर्शन करताना विजय लुल्हे म्हणाले, “निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसून दुसऱ्या अर्थपूर्ण जीवनाचा प्रारंभ आहे. शरीराला विश्रांती द्या; मात्र मनाला कधीही निवृत्त करू नका. आयुष्यभर मिळविलेला अनुभव स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजासाठी उपयोगात आणला पाहिजे.”

“उत्तरायुष्यात कला, संगीत, क्रीडा, प्रवास, वाचन, लेखन अशा आवडत्या छंदांना वेळ द्यावा. सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या अनुभवाचे आणि मार्गदर्शनाचे संचित समाजाला द्यावे. कुटुंबातील मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यासोबत भावनिक नाते जपणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी शामकांत वर्डीकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी आणि ज्येष्ठांच्या सामाजिक व आरोग्यविषयक प्रश्नांवर मार्गदर्शन केले.

कर्तृत्ववान ज्येष्ठांचा सन्मान

यावेळी जीवनभर संघर्ष, कर्तव्य आणि समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या चार ज्येष्ठांचा विशेष सत्कार करण्यात आला.
श्रीमती भागीरथी पुना बारी (वय ८५) यांनी पतीच्या निधनानंतर आर्थिक विवंचनेतही खचून न जाता शेतीकाम तसेच नागवेल पानांच्या जोडणीचे काम करून आपल्या पाच मुलांचे शिक्षण केले. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा यावेळी गौरव करण्यात आला.
सौ. पुष्पा जाधव (वय ७२) या सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचारी असून त्यांनी कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे सांभाळत मुलांना उच्च शिक्षण दिले. कुटुंब आणि सेवाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. न्हानू बुधा दाभाडे (वय ७५) यांनी पत्नीच्या अकाली निधनानंतर पुनर्विवाह न करता तीन मुलांचे संगोपन केले आणि त्यांना शिक्षण दिले. प्रतिकूल परिस्थितीत पालक म्हणून निभावलेल्या त्यांच्या जबाबदारीचा गौरव करण्यात आला.

इंजि. साहेबराव देवराम पाटील (वय ६८) हे म.रा. कनिष्ठ अभियंता संघटनेचे माजी उपाध्यक्ष असून शासकीय अभियंता सहकारी पतपेढी मर्यादित, जळगावचे संस्थापक चेअरमन व आजीव अध्यक्ष आहेत. त्यांच्या पुढाकारातून अभियंता भवन, वाचनालय व ग्रंथालयाची स्थापना करून वाचन चळवळीला चालना देण्यात आली आहे. सोसायटीच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्यकर्त्यांना धनादेश देऊन सन्मानित करणे तसेच समाजप्रबोधनाचे विविध कार्यक्रम राबविण्याचे कार्य ते करीत आहेत.

ज्येष्ठांचा अनुभव ही समाजाची अमूल्य संपत्ती

कार्यक्रमास संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सहसचिव प्रकाश बारी, निवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचारी डिगंबर ढाके, मल्हारराव होळकर कला, ज्ञान विज्ञान बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष शामकांत वर्डीकर, तसेच पद्माकर जाधव, श्रीधर जाधव, सौ. आरती जाधव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारप्राप्त कलाशिक्षक सुनील दाभाडे, सौ. दीक्षा दाभाडे, सौ. कविता पवार, अंकिता मावळे, सौ. कल्पना पाटील आणि विश्वेश पाटील उपस्थित होते.

या उपक्रमाची प्रेरणा संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक म्हस्के, सचिव प्रकाश बारी, सहसचिव व प्रख्यात कथालेखक दीपक तांबोळी, खजिनदार सुनील नेमाडे आणि संचालिका, कवयित्री इंदिरा जाधव यांनी दिली.

कार्यक्रमासाठी मंडळाचे उपाध्यक्ष सुनील जाधव आणि सहखजिनदार उल्हास चौधरी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यांच्या अनुभवाला कुटुंब आणि समाजाच्या विकासाशी जोडण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *