दत्तकला’ शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळला पोलीस कोठडी; अध्यक्ष रामदास झोळ फरार झोळ दांपत्य गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पण झोळ यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना
![]()
‘दत्तकला’ शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळला पोलीस कोठडी; अध्यक्ष रामदास झोळ फरार
झोळ दांपत्य गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पण
झोळ यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना
सोलापूर (प्रतिनिधी): राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एस.आय.टी) मोठे यश मिळाले असून पुणे जिल्ह्यातील स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील ‘दत्तकला शिक्षण संस्थेची’ सचिव माया रामदास झोळ हिच्यासह राजेंद्र हुंबे, लक्ष्मीकांत लिगाडे या इतर दोन साथीदारांना न्यायालयाने २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ हा फरार झाल्याने पोलीस पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा नोंद क्रमांक १९२/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (बी एन एस) कलम ३१८(२), ३१८(४), ३(५), वाढीव कलम १११(२)ब सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम ३(२) आणि ३(३) अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी मनोहर चंद्रकांत भोसले आणि त्याच्या साथीदारांवर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण ६ गुन्हे दाखल असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी विशेष तपास पथक (एस आय टी) स्थापन केले होते, ज्या पथकाने आतापर्यंत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तब्बल २४ आरोपींचा शोध लावला आहे. तपासादरम्यान अघोरी प्रथा आणि फसवणुकीतून मनोहर भोसले याला मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना मदत करणारे संस्थेतील आरोपी राजेंद्र गोकुळ हुंबे याला ११ ऑगस्ट रोजी तर लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे याला १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सविस्तर पोलीस तपासात रामदास झोळ ची पत्नी माया झोळ यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी माया झोळ यांनाही बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान, पूर्व पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज, १७ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांनी या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाने या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तिघांनाही २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास झोळ हा फरार असून एस.आय.टी. चे पथक त्यांच्या शोधासाठी वेगाने कारवाई करत आहे.
———//————

