बजाज फायनान्सच्या कथित अरेरावी विरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन
![]()
बजाज फायनान्सच्या कथित अरेरावी विरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, मानसिक त्रास, आरडाओरड व अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.
श्री. विनोद पाटील (शिरूर) व श्री. वाल्मीक चौधरी (अमळनेर) यांनी कर्जवसुलीच्या संदर्भात बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास, धमकी व आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीबाबत अमळनेर येथील बजाज फायनान्सचे मॅनेजर श्री. दीपक चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धट व आक्षेपार्ह पद्धतीने उत्तर देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
कर्जाचा हप्ता थकीत असल्यास संबंधित वित्तीय संस्थेला कायद्याच्या चौकटीत राहून वसुली करण्याचा अधिकार आहे. मात्र, वसुलीच्या नावाखाली ग्राहकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, अपमानित करणे अथवा मानसिक दबाव आणणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे शिवसेना–युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवावेत, उपलब्ध फोन कॉल रेकॉर्डिंग, ऑडिओ/व्हिडिओ पुरावे व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी आणि चौकशीअंती कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना कर्जवसुलीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची धमकी, शिवीगाळ किंवा मानसिक त्रास दिला जाऊ नये, यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला आवश्यक त्या सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.
“ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना–युवासेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. ग्राहकांशी अरेरावी अथवा गैरवर्तन झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र निषेध नोंदविला जाईल,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राहूल भास्कर कंजर, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज संतोष शेटे, उपतालुका प्रमुख राहूल साहेबराव पाटील, उपतालुका प्रमुख जयेश रवींद्र चव्हाण, युवासेना उपशहर प्रमुख राजा अल्ताफ राजा शेख, युवासेना पदाधिकारी ईश्वर जाधव, सचिन विलास पाटील व प्रदीप किरण देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
— शिवसेना व युवासेना, अमळनेर

