कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात; आदिवासी लोकसंस्कृती, परंपरा आणि कलाविष्काराचा अनोखा जागर
1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात; आदिवासी लोकसंस्कृती, परंपरा आणि कलाविष्काराचा अनोखा जागर

Loading

हमारी धरती, हमारा राज!”च्या जयघोषाने ब्राम्हणवेल दणाणले

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात; आदिवासी लोकसंस्कृती, परंपरा आणि कलाविष्काराचा अनोखा जागर

नंदुरबार प्रतिनिधी (हिरामण सोनवणे)

“एकच चाले, आदिवासी चाले!”, “जय आदिवासी!”, “जय जोहार!”, “हमारी धरती, हमारा राज!” अशा जोशपूर्ण घोषणांनी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल, ता. साक्री, जि. धुळे येथील शालेय परिसर ९ ऑगस्ट रोजी दणाणून गेला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी लोकसंस्कृती, परंपरा, इतिहास आणि कलावैभवाचा सन्मान करणारा विविधांगी कृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी ब्राम्हणवेल येथील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मा. सुरेश वसंत देसाई यांच्यासह ब्राम्हणवेलच्या सरपंच मा. सौ. रेखाताई सुरेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची धुरा सरपंच रेखाताई सुरेश देसाई यांनी सांभाळली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बळीराम माळी, उपाध्यक्षा सौ. हौसाताई तुकाराम माळी, सचिव एकनाथ बळीराम महाजन, बहुसंख्य आदिवासी पालक बंधू-भगिनी, विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ माळी, ज्येष्ठ शिक्षक, सहशालेय समिती प्रमुख तथा कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनील ठाकरे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष सरपंच रेखाताई सुरेश देसाई व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या संघर्षमय जीवनाचे आणि आदिवासी समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या बाह्य फलकावर आकर्षक चित्राकृतीसह फलक लेखन करण्यात आले. हे कलात्मक फलक लेखन कलाशिक्षक हिरामण सोनवणे यांनी केले.

आदिवासी गीतांवर विद्यार्थ्यांचा बहारदार नृत्याविष्कार

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले एकल व सामुदायिक आदिवासी नृत्य सादरीकरण. इयत्ता ५वी ते ७वी आणि इयत्ता ८वी ते १०वी असे दोन गट तयार करून स्पर्धा घेण्यात आली.

विद्यार्थ्यांनी ‘हम से ना टकराना, हम है जंगल के शेर’, ‘वाघ रं वाघ हाऊ जंगलना वाघ’, ‘लाल लाल फडकी उडे’, ‘प्यार पोहरा’ आदी लोकप्रिय आदिवासी गीतांवर लयबद्ध व उत्स्फूर्त नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर

इयत्ता ५वी ते ७वीच्या लहान गटात प्रथम क्रमांक कु. दुर्गा प्रविण शेंडाळे व संपूर्ण इयत्ता ५वी गट, द्वितीय क्रमांक कु. सलोनी रविंद्र सोनवणे व संपूर्ण इयत्ता ६वी गट, तर तृतीय क्रमांक कार्तिक अनिल सोनवणे व इयत्ता ७वी गटाने मिळविला.

इयत्ता ८वी ते १०वीच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक कु. राशी छगन गावीत व इयत्ता १०वी गट, द्वितीय क्रमांक कु. सोनाली शिंदे व इयत्ता ८वी गट, तर तृतीय क्रमांक कु. दिशा कल्पेश सोनवणे व इयत्ता ९वी गटाने पटकावला.
स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक हिरामण सोनवणे यांनी केले. विजेत्या गटांना अनुक्रमे प्रथम १२५ रुपये, द्वितीय ७५ रुपये आणि तृतीय ५० रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात आली.

मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच रेखाताई सुरेश देसाई यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी ५०० रुपये रोख बक्षीस दिले. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब तुकाराम बळीराम माळी व सचिव आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन यांनी संयुक्तपणे १ हजार रुपये रोख बक्षीस तसेच सहभागी व उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्कीट पुडे देऊन प्रोत्साहन दिले.
मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देत त्यांच्या कलागुणांना दाद दिली.

इतिहास, संस्कृती आणि परंपरेवर मार्गदर्शन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक काशिनाथ माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कलाशिक्षक हिरामण सोनवणे यांनी आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास, आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेले घट्ट नाते यावर प्रभावी मनोगत व्यक्त केले.

क्रीडा शिक्षक बाजीराव निकुंभ यांनी “एकच चाले, आदिवासी चाले”, “जय आदिवासी”, “जय जोहार”, “हमारी धरती, हमारा राज!” अशा घोषणांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांच्या दिलखेचक शेरोशायरीने कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले. त्यांनीच आभार प्रदर्शन केले.

‘टिमली सॉंग’वर विद्यार्थ्यांचा जल्लोष

कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी शालेय पटांगणात एकत्र आले. सुप्रसिद्ध आदिवासी ‘टिमली सॉंग’च्या तालावर विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण सामूहिक नृत्य सादर केले. या उत्स्फूर्त नृत्याचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी समाजाची अस्मिता, लोकसंस्कृती, परंपरा, कला आणि निसर्गाशी असलेले नाते जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयातील हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.

One thought on “कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात; आदिवासी लोकसंस्कृती, परंपरा आणि कलाविष्काराचा अनोखा जागर

  1. वाह किती सुंदर बातमी!🌹🌹🌹👌👌👌👏👏👏👏🫡🫡🫡🫡🫡

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *