जिल्ह्यात प्रथम, राज्यात दहावा!, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा मयूर पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला
![]()
जिल्ह्यात प्रथम, राज्यात दहावा!
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा मयूर पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला
अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव मयूर गजानन पाटील याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर राज्यातून दहावा क्रमांक मिळविला आहे. त्याच्या या उज्ज्वल यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रासह साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मयूरच्या या यशाबद्दल स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात त्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहनजी घुगे, जळगाव जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी माननीय करिष्मा नायर आणि जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढिवरे यांच्या हस्ते मयूरचा विशेष सत्कार करण्यात आला.
वाचनाची आवड; ज्ञानाची समृद्ध शिदोरी
मयूरच्या या यशामागे त्याची अभ्यासातील सातत्यपूर्ण मेहनत आणि वाचनाची आवड यांचाही मोठा वाटा आहे. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात तो दर रविवारी नियमितपणे पुस्तक वाचण्यासाठी येत असे. या माध्यमातून त्याने अनेक पुस्तके वाचली असून, वाचनातून मिळविलेली माहिती आत्मसात करण्याची त्याची विलक्षण क्षमता आहे.
एखादे पुस्तक वाचल्यानंतर त्यातील माहिती केवळ लक्षात ठेवणे नव्हे, तर ती समजून घेऊन आत्मसात करण्याची त्याची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे. अत्यंत आज्ञाधारक, कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून मयूरने आपल्या वागणुकीतून व कर्तृत्वातून सर्वांची मने जिंकली आहेत.
सानेगुरुजी ग्रंथालय परिवाराकडूनही कौतुक व सत्कार
मयूरच्या या उल्लेखनीय यशाची दखल पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ, संचालक मंडळ तसेच साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार सर यांनी घेतली. त्यांच्या वतीने मयूरचे कौतुक करून त्याचा सत्कार करण्यात आला आहे.
मयूरच्या यशामुळे वाचन, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घेतल्यास ज्ञानाची व्याप्ती वाढते आणि त्याचा शैक्षणिक प्रगतीला निश्चितच फायदा होतो, याचे मयूर हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
संस्थेकडून अभिनंदन; भावी वाटचालीस शुभेच्छा
मयूरच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. हेमकांत पाटील, संस्थेचे सचिव मा. संदीप घोरपडे, सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


‘प्रखर जनसंवाद’च्या वतीनेही चिरंजीव मयूर गजानन पाटील याचे मनःपूर्वक अभिनंदन! जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात दहावा क्रमांक मिळविणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्याची यशाची भरारी अशीच सातत्याने उंचावत राहो आणि भविष्यात त्याने आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवावा, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!


हार्दिक अभिनंदन मयूर बेटा ! 🌹🌹🌹🌹👏👏👏👏🫡🫡🫡🫡🫡🫡🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳