पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे , परभणीतील महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पमध्ये पत्रकारांच्या हक्कांसाठी व्यापक लढ्याचा निर्धार
![]()
पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे
परभणीतील महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पमध्ये पत्रकारांच्या हक्कांसाठी व्यापक लढ्याचा निर्धार
परभणी जिल्हा प्रतिनिधी
: राज्यात, देशात आणि जगभरात पत्रकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी पत्रकारांच्या प्रश्नांशी संबंधित लढा आणखी तीव्र करण्यात येणार असून, या लढ्यामध्ये देशभरातील सर्व पत्रकारांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक व आंतराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.
परभणी येथे आयोजित महाराष्ट्र राज्याच्या केडर कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ, नरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. तसेच कचरू सारडा, चेतन कात्रे, विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, गोरखनाथ मदने, डॉ. गणेश जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
संदीप काळे म्हणाले की, जगभरातील पत्रकारांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पत्रकारांच्या हत्या, त्यांना तुरुंगात डांबणे, त्यांच्यावर होणारे अत्याचार, धमक्या आणि विविध प्रकारचे दबाव सातत्याने वाढत आहेत. भारतात तसेच महाराष्ट्रातही पत्रकारांवरील दबाव आणि हल्ल्यांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पत्रकारांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. विविध कायद्यांचा गैरवापर करून पत्रकारांच्या अभिव्यक्तीवर निर्बंध आणण्याचे प्रयत्नही थांबविण्याची गरज आहे.
सरकारने पत्रकारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यांच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका घ्यावी. पत्रकारांच्या हक्कांसाठी आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत, तर व्हाईस ऑफ मीडिया अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही संदीप काळे यांनी दिला. देशभरातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी नुकतेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात आले असून, हा लढा यापुढे आणखी व्यापक आणि तीव्र करण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनलने पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, पत्रकार हा केवळ बातमी देणारा घटक नाही, तर समाजातील घडामोडींचा आरसा आहे. समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांच्या समस्या शासन आणि समाजासमोर मांडण्याचे काम पत्रकार करतो. त्यामुळे पत्रकार सुरक्षित आणि स्वतंत्र असणे हे लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पत्रकार सुरक्षित नसेल तर मुक्त आणि निर्भीड पत्रकारिता कशी होणार, हा प्रश्न आज गंभीरपणे विचारण्याची गरज आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिगंबर महाले, नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ, नरेंद्र देशमुख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
केडर कॅम्पमध्ये राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पत्रकारांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये आणि विभागांमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. संघटनात्मक पातळीवर करण्यात आलेली तयारी, पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेले उपक्रम आणि आगामी काळातील नियोजन याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
नवनिर्वाचित सरचिटणीस संपादक विशाल पाटील यांनी केडर कॅम्पमध्ये उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजातील वास्तव परिस्थिती लोकांसमोर मांडण्याची महत्त्वाची जबाबदारी पत्रकार पार पाडत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विशाल पाटील म्हणाले,
पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, त्यांच्या सुरक्षितता, सन्मान आणि सामाजिक सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.
आज पत्रकारांसमोर अनेक आव्हाने आहेत. बदलत्या डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप बदलत असताना पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या हक्कांसाठी उभी राहिली आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद केला पाहिजे.
पत्रकार मजबूत झाला, तर लोकशाही मजबूत होईल आणि लोकशाही मजबूत झाली तर समाज अधिक सक्षम होईल.
राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम देशभरात आणि जगभरात विविध पातळ्यांवर सक्रियपणे काम करत असल्याचे सांगितले. पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सांगलीसह विविध भागांत सुरू असलेले व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रकल्प तसेच कोकण विभागात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचाही त्यांनी आढावा मांडला.
दिवसभर चाललेल्या या केडर कॅम्पमध्ये विविध मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संघटनेच्या आगामी कार्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली.
परभणीतील या केडर कॅम्पच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा आणि पत्रकारांच्या हक्कांसाठीचा लढा राज्यासह देशभरात अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला.
————
फोटो ओळ:
परभणी येथे आयोजित महाराष्ट्र राज्याच्या केडर कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिगंबर महाले, नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ, नरेंद्र देशमुख,कचरू सारडा, चेतन कात्रे, विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, गोरखनाथ मदने, डॉ. गणेश जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
———

