ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा फटका; खवशी-पातोंडा गावांचा संपर्क तुटला
![]()
ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा फटका; खवशी-पातोंडा गावांचा संपर्क तुटला
अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार)
नांद्री-खवशी रस्त्यावरील अपूर्ण भरावामुळे पुराच्या पाण्यात नागरिकांची गैरसोय; कामाची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी
अमळनेर : तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराचा मोठा फटका अनेक गावांना बसला. याच पुराच्या पाण्यामुळे खवशी व पातोंडा गावांचा काही काळ संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अमळनेर तालुक्यातील नांद्री-खवशी रस्त्याचे यावर्षी डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. त्यापूर्वी या मार्गावरील फरशी पुलांचे नवीन बांधकामही करण्यात आले होते. खवशी गावालगत असलेल्या खोलगट फरशी पुलाचे मोठ्या व उंच पुलामध्ये रूपांतर करण्यात आले. मात्र, पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही दोन्ही बाजूंच्या लेव्हलनुसार आवश्यक भराव व जोडणीचे काम अपूर्ण राहिले.
जोरदार पावसामुळे पुराचे पाणी वाढल्यानंतर या अपूर्ण कामाचा फटका बसला. पुलाच्या दोन्ही बाजूंना योग्य भराव नसल्याने रस्त्याचा संपर्क खंडित झाला आणि खवशी गावाचा नांद्री तसेच पातोंडा गावाशी असलेला संपर्क काही काळासाठी तुटला.
पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अचानक संपर्क तुटल्याने नागरिक, विद्यार्थी व अत्यावश्यक कामांसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पुलाच्या दोन्ही बाजूंचे भराव व लेव्हलनुसार डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी खवशी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

