कला समाजमनाला जागवणारी चेतना; कलाकार नवसंजीवनीचे शिल्पकार! , ‘कोयताबंद’ व ‘हुंदका – द व्हायरस’ दीर्घलघुपटांच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डी. बी. जगत्पुरिया यांचे प्रतिपादन
![]()
कला समाजमनाला जागवणारी चेतना; कलाकार नवसंजीवनीचे शिल्पकार!
‘कोयताबंद’ व ‘हुंदका – द व्हायरस’ दीर्घलघुपटांच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डी. बी. जगत्पुरिया यांचे प्रतिपादन
कन्नड प्रतिनिधी :
समाजातील वेदना, संघर्ष आणि वास्तव यांना कलात्मक अभिव्यक्ती देत मरगळलेल्या समाजजीवनात नवसंजीवनी फुंकण्याचे सामर्थ्य कलाकारांमध्ये असते. कलाकार हा केवळ मनोरंजन करणारा नसून समाजमनाला दिशा देणारा संवेदनशील शिल्पकार असतो, असे प्रभावी प्रतिपादन विख्यात कवी, समीक्षक व विचारवंत डी. बी. जगत्पुरिया यांनी केले.
कन्नड येथील शिक्षक सभागृहात नानाई फिल्म्स प्रॉडक्शनच्या आगामी ‘कोयताबंद’ आणि ‘हुंदका – द व्हायरस’ या दोन आशयघन दीर्घलघुपटांसाठी आयोजित अभिनय चाचणी (ऑडिशन) कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
निर्माती सौ. अर्चना प्रविणकुमार अहिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य समन्वयक दीपकदादा पवार, लोकशाहीर सी. के. मिस्तरी, अभिनेत्री अनुपमा पाटील, लेखक बशिरमियाँ देगलूरकर तसेच पत्रकार संघटनेचे विठ्ठल शिरसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याशिवाय जिल्हा परिषद सदस्य दिलीपसिंग राजपूत, डॉ. प्रीती राजपूत आणि ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सुरडकर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
या ऑडिशनसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नवोदित आणि अनुभवी कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कलाकारांच्या अभिनयकौशल्याची कसून चाचणी घेण्यात आली.
‘कोयताबंद’ हा दीर्घलघुपट ऊसतोड कामगारांच्या हालअपेष्टा, त्यांच्या कष्टमय जीवनाचा संघर्ष आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होणारे गंभीर परिणाम यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणार आहे. तर ‘हुंदका – द व्हायरस’ हा दीर्घलघुपट कोरोना महामारीच्या काळात सामान्य माणसाने भोगलेल्या वेदना, असहाय्यता आणि मानवी संवेदनांचे विदारक वास्तव प्रेक्षकांसमोर उभे करणार आहे.
लेखक, दिग्दर्शक आणि सिनेअभिनेते प्रविणकुमार अहिरे तसेच निर्माती सौ. अर्चना अहिरे यांनी सांगितले की, दोन्ही दीर्घलघुपटांचे चित्रीकरण लवकरच ग्रामीण भागात सुरू होणार असून सामाजिक आशयाला प्राधान्य देणाऱ्या या कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करतील.
सामाजिक बांधिलकी, संवेदनशील विषयांची प्रभावी मांडणी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा नानाई फिल्म्स प्रॉडक्शनचा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

