भक्तीचे सूर, संस्कारांचा सुगंध अन् महिला सक्षमीकरणाचा वसा; ‘श्री नारायणी महिला गायन ग्रुप’ची उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख ,अवघ्या दोन वर्षांत २५० हून अधिक कार्यक्रम; जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबईपर्यंत भक्तीचा सुरेल प्रवास
![]()
भक्तीचे सूर, संस्कारांचा सुगंध अन् महिला सक्षमीकरणाचा वसा; ‘श्री नारायणी महिला गायन ग्रुप’ची उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख
अवघ्या दोन वर्षांत २५० हून अधिक कार्यक्रम; जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबईपर्यंत भक्तीचा सुरेल प्रवास
अमळनेर प्रतिनिधी : भक्ती, संस्कार, समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम घडविणाऱ्या **’श्री नारायणी महिला गायन ग्रुप, अमळनेर’**ने अवघ्या दोन वर्षांत उल्लेखनीय कार्य करत उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डोहाळे जेवण, बारसे, वाढदिवस, हळद, मेहंदी, कानबाई, लग्नसोहळे, देवीची गीते, भजने, अभंग, गवळणी, भारूड, कीर्तन तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे या महिला मंडळाने आजपर्यंत २५० हून अधिक कार्यक्रम यशस्वीपणे सादर केले आहेत.
अमळनेरमधून सुरू झालेला हा भक्तीचा प्रवास आज जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबई अशा विविध शहरांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या सुरेल गायनशैली, भक्तिभाव आणि संस्कारमूल्यांमुळे या मंडळाला विविध ठिकाणांहून सातत्याने निमंत्रणे मिळत आहेत. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी श्रद्धेने सहभागी होणाऱ्या या महिला समाजात आपुलकीचे नाते निर्माण करत आहेत.
या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सेवाभावाला प्राधान्य. कोणताही निश्चित मानधनाचा आग्रह न धरता, सर्वसामान्यांनाही सहज परवडेल अशा पद्धतीने आणि यजमानांच्या इच्छाशक्तीनुसार देणगी स्वीकारून हे मंडळ कार्यक्रम सादर करते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीची अडचण न येता अनेक कुटुंबांना धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरे करता येतात.
मंडळाच्या अध्यक्षा पूजाताई पाटील यांनी सांगितले की, “आमचा उद्देश केवळ गाणे सादर करणे नसून, भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणे हा आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. प्रत्येक कार्यक्रम हा आमच्यासाठी सेवाकार्य आहे.”
श्री नारायणी महिला गायन ग्रुपच्या कार्यकारिणीत अध्यक्षा पूजाताई पाटील, उपाध्यक्षा कल्पना पाटील, सचिव शोभा पाटील, कोषाध्यक्षा मेघा पाटील तसेच मालती पाटील, सुनिता पाटील आणि सुवर्णा पवार या सदस्य कार्यरत असून सर्वजणी भक्ती, संस्कृती आणि समाजसेवेचा वसा जपत कार्यरत आहेत.
भक्तीचे सूर, आनंद भरपूर… प्रत्येक कार्यक्रम अविस्मरणीय करण्याचा ध्यास घेतलेल्या श्री नारायणी महिला गायन ग्रुपने अल्पावधीतच समाजमनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

