मोबाईल ईव्हीएमद्वारे लोकशाहीचा अनोखा धडा; छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न  ,विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत घेतला उत्स्फूर्त सहभाग; तेजस शनवार मुख्यमंत्री, वेदिका राबडे उपमुख्यमंत्रीपदी विजयी
1 min read

मोबाईल ईव्हीएमद्वारे लोकशाहीचा अनोखा धडा; छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न ,विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत घेतला उत्स्फूर्त सहभाग; तेजस शनवार मुख्यमंत्री, वेदिका राबडे उपमुख्यमंत्रीपदी विजयी

Loading

मोबाईल ईव्हीएमद्वारे लोकशाहीचा अनोखा धडा; छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत घेतला उत्स्फूर्त सहभाग; तेजस शनवार मुख्यमंत्री, वेदिका राबडे उपमुख्यमंत्रीपदी विजयी

मोखाडा प्रतिनिधी-(अशोक मालक
राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था, जव्हार संचलित छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे (ता. जव्हार, जि. पालघर) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक मोबाईल ईव्हीएम (Electronic Voting Machine) ॲप्लिकेशनद्वारे अत्यंत उत्साहात आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेचे संस्थापक आदरणीय शिवश्री सुनीलजी पाटील व संस्था अध्यक्षा आदरणीय सौ. जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात निवडणूक आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. उमेदवारी अर्ज भरणे, पॅनल तयार करणे, प्रचार, आचारसंहितेचे पालन, शांतता कालावधी आणि अखेरीस मोबाईल ईव्हीएमद्वारे मतदान अशा प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले.
दि. 10 जुलै 2026 रोजी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 11 जुलै रोजी उमेदवारांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या योजना, शाळेच्या विकासासाठीचे संकल्प आणि नेतृत्वाचा दृष्टिकोन मांडत प्रचार केला. प्रचारानंतर निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांना सुजाण मतदार म्हणून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
दि. 13 जुलै 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया मोबाईल ईव्हीएम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पार पडली. सकाळपासूनच शाळेचे वातावरण निवडणूकमय झाले होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करत लोकशाही प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक श्री. पी. एम. रुकारी यांनी जबाबदारी सांभाळली. निवडणूक प्रशिक्षण अधिकारी श्री. जी. एन. हाके, नोडल अधिकारी श्री. जी. ए. कोर, झोनल अधिकारी श्री. आर. के. चव्हाण तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती जे. एस. अहिरे यांनी प्रभावीपणे केले.
मतमोजणीनंतर इयत्ता दहावीचा विद्यार्थी कुमार तेजस शिरीष शनवार याने 78 पैकी 36 मते मिळवत मुख्यमंत्रीपदावर विजय मिळविला, तर इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी वेदिका सतीश राबडे हिने 24 मते मिळवत उपमुख्यमंत्रीपद पटकावले. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी विजयी उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव करत जल्लोष साजरा केला.

निवडणूक प्रक्रियेत केंद्राध्यक्ष कु. पायल शंकर धिंडा, मतदान अधिकारी केतन प्रवीण गहला, कु. चंद्रशेखर परशुराम धिंडा, सुरेखा कल्पेश जोगारी, शिपाई नकुल चौधरी, सुरक्षारक्षक कु. शंकर संतोष वळवी, बीएलओ कु. पृथ्वीराज सुरेश जोगारी तसेच मतदान प्रतिनिधी कु. उमेश देवराम नडगे यांनी आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण श्री. प्रवीण खोडे, श्री. पांडुरंग पगार आणि श्री. यज्ञेश्वर अहिरे यांनी केले. मुख्याध्यापक श्री. पी. एम. रुकारी, श्रीमती जे. एस. अहिरे, श्री. जी. ए. कोर, श्री. जी. एन. हाके, श्री. आर. के. चव्हाण, श्री. पी. एम. खोडे, श्री. पी. एस. पगार, श्री. वाय. एम. अहिरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा आगळावेगळा लोकशाही उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

चौकट
शालेय स्तरावर प्रत्यक्ष मोबाईल ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, जबाबदारी आणि मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणारा आदर्श उपक्रम म्हणून त्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *