मतदान यादी पुनर्निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल , सकाळी ७ ते दुपारी १२.३५ पर्यंत शाळा; महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी एस. डी. भिरूड यांच्या मागणीला यश
![]()
मतदान यादी पुनर्निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल
सकाळी ७ ते दुपारी १२.३५ पर्यंत शाळा; महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी एस. डी. भिरूड यांच्या मागणीला यश
जळगाव | प्रतिनिधी
मतदान यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेसाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर (भा.प्र.से.) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० ते दुपारी १२.३५ या वेळेत शाळा भरतील. शनिवारी मात्र शाळा नियमित वेळेनुसार सुरू राहतील. तसेच कला, क्रीडा व कार्यानुभवाच्या अखेरच्या तासिकेऐवजी नियमित अध्यापन तासिका घेण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय नियोजनानुसार ‘निपुण’ तासिका सकाळी ११ ते १२ या वेळेत पूर्ववत सुरू राहणार आहे.
या संदर्भात महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी एस. डी. भिरूड तसेच माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव यांनी शिक्षकांवरील वाढलेल्या जबाबदाऱ्यांचा विचार करून शालेय वेळेत बदल करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सुधारित वेळापत्रक लागू केल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शिक्षकांना निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची जबाबदारी पार पाडतानाच विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन अबाधित राहावे, या उद्देशाने प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.


