अमळनेर गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची प्रशासनाकडे जोरदार मागणी, मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; नगरपरिषदेच्या कत्तलखान्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
![]()
अमळनेर गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची प्रशासनाकडे जोरदार मागणी
मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; नगरपरिषदेच्या कत्तलखान्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरात ३ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उघडकीस आणलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणात अद्यापही अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद–बजरंग दल, अमळनेर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात केवळ घटनास्थळी उपस्थित व्यक्तींवर कारवाई करून प्रकरण संपविण्याऐवजी संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, आर्थिक लाभार्थी, वाहतूक साखळी तसेच संबंधित सर्व व्यक्तींना कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणातील कातड्यांच्या साठ्याची चौकशीची मागणी
ज्या ठिकाणाहून तीन जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली, त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशांच्या कातड्यांचा साठा आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कातड्यांचा स्वतंत्र पंचनामा करून जप्ती करण्यात यावी. तसेच त्यांचा उगम, वाहतूक, साठवणूक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या कत्तलखान्याचीही निष्पक्ष चौकशी करा
नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून गोवंशाची कत्तल होत असल्याच्या आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित कत्तलखाना, जबाबदार अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधित व्यक्तींवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कत्तलखान्यात कोणत्या प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी आहे, प्रत्यक्षात कोणत्या प्राण्यांची कत्तल केली जाते, याच्या नोंदींचीही तपासणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तपासाबाबत उपस्थित केले गंभीर प्रश्न
विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाने तपास प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एलसीबीने गुन्हा उघडकीस आणल्यानंतर पुढील तपास स्थानिक पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला, घटनास्थळी ताब्यात घेतलेल्या व्यक्ती व नंतर दाखल झालेल्या फिर्यादीतील आरोपींच्या नावांमध्ये बदल का झाला, इतर संशयित आरोपींना अटक न करता ‘परार’ का दाखविण्यात आले, तसेच मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात विलंब का होत आहे, याबाबत वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तातडीने प्रभावी कारवाई केली नाही, चौकशीत दिरंगाई झाली किंवा दोषींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा, आमरण उपोषण तसेच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावेळी प्रखंड अध्यक्ष डॉ. संजय शाह, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, प्रखंड संयोजक सचिन महाजन, विजय पाटील यांच्यासह विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एक हजाराहून अधिक हिंदुत्वनिष्ठ नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

