संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानच्या आगग्रस्त परिसराची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी; पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मागणी, नुकसानीचा सविस्तर आढावा • भाविकांना दिलासा • शासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन
![]()
संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानच्या आगग्रस्त परिसराची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी; पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मागणी
नुकसानीचा सविस्तर आढावा • भाविकांना दिलासा • शासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रातील लाखो वारकरी, भाविक आणि श्रद्धाळूंचे आराध्य श्रद्धास्थान असलेल्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्त परिसराची पाहणी केली. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी, प्रशासनातील अधिकाऱ्यांशी व स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.
या दुर्घटनेत संस्थानाच्या इमारतीचे तसेच धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, या दुर्घटनेत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मुख्य मूर्ती सुरक्षित राहिल्या तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या अमळनेर व परिसरातील अग्निशमन दल, आर.बी. कन्स्ट्रक्शनचे टँकर, खाजगी टँकर चालक तसेच स्थानिक नागरिकांचे विशेष कौतुक केले. सर्वांनी धाडस, तत्परता आणि सेवाभावाने केलेल्या प्रयत्नांमुळे मोठी हानी टळल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या पवित्र संस्थानाची पुनर्बांधणी तातडीने व्हावी आणि भाविकांना पूर्वीप्रमाणे दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विशेष बाब म्हणून ₹१५ कोटींचा आपत्कालीन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आजच्या पाहणीत पुनर्बांधणीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की, “संत श्री सखाराम महाराजांचे हे पवित्र स्थान केवळ मंदिर नसून लाखो भाविकांच्या श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचे प्रेरणास्थान आहे. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे वैभव पुन्हा पूर्ववत उभे राहावे, यासाठी शासन स्तरावर तसेच वैयक्तिक पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”

