स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एन. एस. एस. तर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
![]()
*स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एन. एस. एस. तर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
अमळनेर : आषाढी वारीनिमित्त संत सखाराम महाराज यांच्या पालखीने नुकतेच अमळनेर येथील तुळशीबाग परिसरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, प्रताप महाविद्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक महाविद्यालयातून प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छता अभियान राबविले.
उपक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी तुळशीबाग परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा वेचून परिसर स्वच्छ केला. तसेच वारकरी व नागरिकांना “स्वच्छ वारी, हरित वारी”चा संदेश देत पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेबाबत जनजागृती केली. त्यानंतर भाविकांना संत सखाराम महाराजांचे दर्शन शिस्तीत घेता यावे म्हणून स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन मदत केली.
यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. लीलाधर पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रताप महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ. सुनील राजपूत, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली राठोड, समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर तसेच तिन्ही महाविद्यालयांतील स्वयंसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. संदीप नेरकर यांनी सांगितले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वारकरी आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रभावी संदेश पोहोचत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास या अभियानाची महत्त्वपूर्ण मदत होत आहे.

