*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात*
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात*
जळगाव दि. ०१/०७/२०२६- के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करणे, डॉक्टर या व्यवसायाचे सामाजिक महत्त्व समजावून सांगणे तसेच भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे उपस्थित होत्या. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे , प्रतिभा लोहार,श्रीमती पूनम कोल्हे व श्रीमती वर्षा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमासाठी डॉ. विलास भोळे (मातृसेवा हॉस्पिटल, जळगाव) आणि डॉ. सचिन सरोदे (सरोदे युरोलॉजी अँड मॅटरनिटी हॉस्पिटल, जळगाव) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवर डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील विविध संधी, डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास, सातत्य, मेहनत, वेळेचे योग्य नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि ध्येय निश्चिती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. रुग्णसेवा, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी, मानवतेची जपणूक आणि संकटसमयी समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी डॉक्टर कशा प्रकारे पार पाडतात, याची अनेक प्रेरणादायी उदाहरणांसह माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमास १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, जळगावचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रवीण मिनोत्रा यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासाचे योग्य नियोजन, शिस्त, आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन तसेच राष्ट्रसेवा आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी एनसीसीचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने कर्नल प्रवीण मिनोत्रा यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधी, डॉक्टर या व्यवसायाचे सामाजिक महत्त्व आणि शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक दिशा मिळाली. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

