अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक
![]()
अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार
शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक
अमळनेर प्रतिनिधी:-यंदाच्या उन्हाळ्यात शहरात काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठाचे नियोजन कोलमडून नागरिकांना विलंबाने पाणी मिळाले परंतु आता तापीतही पाणी आले असल्याने लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आम्ही करू याशिवाय स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा निश्चितपणे करू अशी ग्वाही गटनेत्या सौ जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शविआच्या बैठकीत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.
दरम्यान नगरसेवक डॉ. डीगंबर महाले यांनी आजची बैठक राजकीय चिखल फेकीची नसून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.नगरपालिका सभागृहात झालेल्या या बैठकीत शहरातील नागरी समस्यांबाबत गटनेत्या सौ जयश्री पाटील व नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते.नगरसेवकांच्या काही प्रश्नांवर अधिकार निरुत्तर होत होते.एकंदरीत पालिकेतील सत्ताधारी व अधिकारी यांच्यात योग्य तो समन्वय नसल्यामुळेच पालिकेचा कारभार सुरळीत नसल्याचा उपस्थितांनी आरोप केला.
यंदाच्या उन्हाळ्यात संपुर्ण दोन महिने नागरिकांना 8 ते 12 दिवसाआड पाणी मिळाल्याने शहर विकास आघाडीने पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मुख्याधिकारी शिंदे यांनी मोर्चा न काढण्याबाबत दिलेल्या विनंती पत्रास मान देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला होता. यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी प्रशासकिय बैठक बोलवावी अशी मागणी गटनेत्या सौ जयश्रीताई पाटील यांनी केल्याने दिनांक 30 जुन रोजी सकाळी 11 वाजता ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत विस्कळीत पाणीपुरवठा,टाकी सफाई नतंरही होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा,गटारी तुंबल्याने पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचणारे पाणी,भुयार गटार,पाणीपुरवठा टीडीएस व प्रामुख्याने कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक , सफाई कामगारांचे मनमानी समायोजन,काही ठेकेदारांची अक्षम्य कर्तव्य कसूरी आदी समस्या नगरसेवकांनी अत्यंत आक्रमकतेने मांडल्या .विशेषत :विस्कळीत ,अशुद्ध व अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणारा पाणीपुरवठा आणि कचरा गाडीतून झालेली मृतदेहाची वाहतूक या प्रश्नांवर साऱ्यांनी अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरले.घनकचरा ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून गुन्हे दाखल करावेत तसेच वर्षानुवर्षे पाण्याच्या टाक्या साफ न करता नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी केली.
प्रामुख्याने सौ.जयश्रीताई पाटील यांचेसह नगरसेवक डॉ .डिगंबर महाले,विक्रांत पाटील,जितेंद्र ठाकूर,भरत ललवाणी,योगिता कापडणेकर,हाजी नसीरोद्दीन, जुबेदा आपा , नरेंद्र संदानशीव ,मुक्तार खाटीक, सचीन पाटील, शोभाबाई गढरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तर इतर नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्यां मांडल्या.
शहरात मिळते चक्क 400 टीडीएस चे पाणी
अमळनेर शहरात सध्या नागरिकांना मिळत असलेल्या पाण्याचे टीडीएस किती हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष पाणी टाकीवरील पाणी बाटलीत आणून सभागृहातच ते चेक करण्यात आले असता त्याचे टीडीएस चक्क 400 पर्यंत आले.हे पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाणीपुरवठा अभियंत्यांना विचारले असता ते निरुत्तर झाले.खरे पाहता जास्तीजास्त 200 ते 250 टीडीएस पाणी असायला हरकत नाही परंतू 400 पर्यंत टीडीएस जात असेल तर लोकांच्या जीवाशी खेळ करू नका याकडे लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी द्या अशी मागणी सर्वानी केली.
शेवटी मुख्याधिकारी शिंदे सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देताना लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.व इतर प्रश्नांवर देखील गांभीर्याने कार्यवाही करण्याची हमी देत नागरी समस्यांबाबत प्रशासन कोणतीही कसुराई करणार नाही असे आश्वसित केले.
सदर बैठकीत
मुख्यधिकारी गणेश शिंदे,पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील,,प्रविणकुमार बैसाणे,आरोग्य निरीक्षक संतोष माणिक,किरण कंडारे,बांधकाम अभियंता सचिन गवांदे,दिवाबत्ती अभियंता कुणाल महाले,वसुली विभागाचे लौकिक समशेर,वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन,सभा लिपिक प्रमोद लटपटे उपस्थित होते.
तर बैठकीस श.वि.आ.च्या वतीने गटनेत्या जयश्रीताई पाटील, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका योगिता कापडणेकर, जुबेदाबी नासिरोद्दीन हाजी, अफसाना खाटीक,नंदा संदानशिव, शोभाबाई गढरे,विजय पाटील, सचिन पाटील, देवेंद्र कांबळे, भरतकुमार ललवानी,माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, राष्ट्रवादी शहरध्यक्ष चेतन राजपूत, समाजसेवक जितेंद्र ठाकूर, विक्रांत पाटील, नरेंद्र संदानशिव, मुक्तार खाटीक, नसरोद्दीन हाजी,विजय राजपूत, सयाजीराव कापडणेकर, भूषण भदाणे, सुनील शिंपी, संजय पुनाजी पाटील, गौरव महाजन आणि शुभम पाटील उपस्थित होते.
सदर सभागृहातील घड्याळ बंद असल्याचे शेतकी संघाचे संचालक संजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.


