पांझरा काठावरच्या सेवाभावी कार्याला मानाचा मुजरा! , ह. भ. प. भगवान माळी महाराज यांना ‘संत शिरोमणी सावता माळी’ पुरस्कार
![]()
पांझरा काठावरच्या सेवाभावी कार्याला मानाचा मुजरा!
ह. भ. प. भगवान माळी महाराज यांना ‘संत शिरोमणी सावता माळी’ पुरस्कार
अमळनेर प्रतिनिधी : पांझरा काठावरील शहापूर येथील सुप्रसिद्ध ह. भ. प. भगवान माळी महाराज यांच्या सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत त्यांना ‘संत शिरोमणी सावता माळी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. एरंडोल येथे आयोजित संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१व्या संजीवन समाधी सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.
सावित्री शक्तिपीठ, पुणे व सर्वोदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह. भ. प. भगवान माळी महाराज यांना सन्मानपत्र व संत सावता महाराजांची पगडी प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
भगवान महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक सेवा, धार्मिक कार्य आणि समाजप्रबोधनासाठी समर्पित केले आहे. अध्यात्माच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार रुजविणे, धार्मिक परंपरांचे जतन करणे तसेच समाजाला प्रबोधनाची दिशा देण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. त्यांच्या या दीर्घकाळच्या सेवाभावी कार्याची दखल घेत पुरस्कार समितीने त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली.
मान्यवरांची उपस्थिती
या पुरस्कार सोहळ्यास दशरथ कुळभरण (पुणे), डॉ. सुनीता शिंदे (संभाजीनगर), अरुण माळी व पी. जी. चौधरी (एरंडोल), एस. बी. महाजन (रावेर), विश्वास महाजन व सुधाकर महाजन (वाघोड), प्रकाश महाजन (बऱ्हाणपूर), साहेबराव माळी (भडगाव), प्रा. उत्तम पवार (जामनेर), के. एस. महाजन (पाचोरा) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्याचा सन्मान, पुढील वाटचालीस शुभेच्छा
भगवान माळी महाराज यांना मिळालेल्या या सन्मानामुळे शहापूर परिसरासह अमळनेर तालुक्यातील समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव म्हणजे समाजसेवा, अध्यात्म आणि प्रबोधनाच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या कार्याला मिळालेली पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, कळमसरे येथील माळी महासंघाचे माजी अध्यक्ष तथा हरिभक्त पारायण, आयुर्वेदाचार्य आबासाहेब मुरलीधर चौधरी यांनी भगवान महाराजांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक, धार्मिक व प्रबोधनात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

