राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी, मान्यवरांचा सत्कार, निबंध स्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थिनींना सामाजिक समतेचा संदेश
![]()
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी
मान्यवरांचा सत्कार, निबंध स्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थिनींना सामाजिक समतेचा संदेश
अमळनेर प्रतिनिधी :
खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत रयतेचे राजे, दूरदर्शी समाजसुधारक आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध प्रेरणादायी उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी निवड झालेले तसेच दै. जनवास्तवचे संपादक चेतनभाऊ राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून दै. महा दर्पणचे संपादक रविंद्रभाऊ मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती आठवले, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी पी. पी. जोशी, प्रमुख वक्त्या कु. स्नेहल शिसोदे, ज्येष्ठ कला शिक्षक एस. एस. माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक के. आर. बाविस्कर, आर. एस. सोनवणे तसेच ज्येष्ठ लिपिक शाम पवार उपस्थित होते.
यावेळी चेतन राजपूत यांच्या शहराध्यक्षपदी निवडीबद्दल तसेच पुरस्कारप्राप्त पत्रकार रविंद्र मोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि राजर्षी शाहू महाराजांचे पुस्तक देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, शिक्षण, आरक्षण आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करत विद्यार्थिनींना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्त्या कु. स्नेहल शिसोदे यांनी शाहू महाराजांचा जीवनप्रवास आणि समाजपरिवर्तनातील योगदान प्रभावीपणे उलगडून सांगितले.
याच निमित्ताने विद्यार्थिनींसाठी राजर्षी शाहू महाराज जीवन व कार्य या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सकाळ व दुपार सत्रातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनींना शाहू महाराजांचे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात चेतनभाऊ राजपूत यांनी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक समता, व्यायामशाळा, रोजगारनिर्मिती आणि सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एस. देवरे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. पी. एस. सराफ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र जैन, सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



