पत्रकारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन : संदीप काळे संजय दिना पाटील यांनी लेखी माफी मागावी; अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा
![]()
पत्रकारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन : संदीप काळे
संजय दिना पाटील यांनी लेखी माफी मागावी; अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया – व्हीओ एम इंटरनॅशनल फोरमने आक्रमक भूमिका घेतली आहे. संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत, या कालावधीत योग्य ती कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
संदीप काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, पत्रकारांना धमकी देणे, त्यांचा अवमान करणे आणि त्यानंतर केवळ “दिलगिरी व्यक्त करतो” असे सांगून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न करणे स्वीकारार्ह नाही. चूक झाली असेल तर संबंधितांनी स्पष्टपणे “माझ्याकडून चूक झाली, मी सर्व पत्रकारांची बिनशर्त माफी मागतो,” असे जाहीरपणे सांगावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
संदीप काळे यांनी असेही म्हटले की, पत्रकारांचा अवमान झाल्यानंतर त्याचा निषेध करण्याऐवजी काही एकनाथ शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींनी संजय दिना पाटील यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असून, पत्रकारांविषयी अवमानकारक भाषा कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही.
“हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. पत्रकारांचा अपमान या राज्यातील जनता सहन करणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
व्हॉईस ऑफ मीडिया – व्हीओ एम इंटरनॅशनल फोरमने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी सर्व पत्रकारांची लेखी व बिनशर्त माफी मागावी, अशीही संघटनेची भूमिका आहे.
संदीप काळे यांनी स्पष्ट इशारा दिला की, दोन दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी देण्यात येतील. याशिवाय, व्हॉईस ऑफ मीडिया – व्हीओ एम इंटरनॅशनल फोरमच्या नेतृत्वाखाली राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण ही लोकशाहीची मूलभूत गरज असल्याचे अधोरेखित केले. अनिल मस्के राष्ट्रीय अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया – व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम,विजय चोरडिया राज्य कार्याध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया – व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, पत्रकारांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे उत्तर द्यावे लागेल आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही व्हॉईस ऑफ मीडिया – व्हीओ एम इंटरनॅशनल फोरमने केली आहे.

