एक पाऊल शितिजाकडे… दिव्यांग सक्षमीकरणाची उंच भरारी! स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाच्या नव्या वास्तूचे उदया लोकार्पण; विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
![]()
एक पाऊल शितिजाकडे… दिव्यांग सक्षमीकरणाची उंच भरारी!
स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाच्या नव्या वास्तूचे आज लोकार्पण; विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
आर. के. नगर येथील नव्या वास्तूमध्ये फिजिओथेरपी कक्ष, हस्तक्षेप केंद्र, वसतीगृह, क्रीडा विभागासह अनेक सुविधांचे लोकार्पण.
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत असलेल्या स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालय, अमळनेर यांच्या नव्या वास्तूचे उद्घाटन व विविध विभागांच्या शुभारंभाचा सोहळा दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ११.१० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
आर. के. नगर, एकांतेश्वर महादेव मंदिराजवळील विद्यालयाच्या नव्या परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जळगाव श्री. पी. एस. म्हस्के यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
यावेळी शिक्षण सभापती, नगर परिषद अमळनेर मा. नावेद अहमद मुर्शिद शेख यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन, अर्बन बँक अमळनेरचे चेअरमन तथा नगरसेवक मा. भरत सुरेश ललवाणी यांच्या हस्ते फिजिओथेरपी कक्ष उद्घाटन, सामाजिक कार्यकर्ते मा. विश्वनाथ पितांबर पाटील यांच्या हस्ते शीघ्र निदान व हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
तसेच मा. नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या हस्ते पूर्व प्राथमिक विभाग, मा. अभिषेक विनोद पाटील यांच्या हस्ते क्रीडा विभाग, मा. प्रताप छबुलाल साळी यांच्या हस्ते रिक्रिएशन हॉल, आरोग्य सभापती मा. रामकृष्ण बापूराव पाटील यांच्या हस्ते वसतीगृह, तर नगरसेविका मा. निलिमा विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते स्वयंपाकगृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
याचप्रसंगी मा. महेशबापू देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व स्टेशनरीचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात गणेश मॅटरनिटी हॉस्पिटल, अमळनेरचे संचालक डॉ. प्रसन्न जोशी व डॉ. उर्वी प्रसन्न जोशी यांचा विशेष अतिथी म्हणून सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी उभारण्यात आलेली ही आधुनिक वास्तू आणि विविध सुविधा विद्यार्थ्यांच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. भगवानजी तलवारे (मराठे) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमास नागरिक, पालक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी तसेच परिसरातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

