महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देओल यांची ए.टी. झांबरे विद्यालयास भेट; विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद
![]()
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देओल यांची ए.टी. झांबरे विद्यालयास भेट; विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद
जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव श्री. रणजीत सिंग देओल यांनी आज के. सी. ई. सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे सदिच्छा भेट देऊन शाळेतील शैक्षणिक वातावरण, विविध शैक्षणिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव श्री. तुषार महाजन, नाशिक विभागाचे उपसंचालक श्री. संजय कुमार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. निलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. तडवी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), जळगावचे प्राचार्य डॉ. श्री. अनिल झोपे, अधिव्याख्याता श्री. चंद्रकांत साळुंखे तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक श्री. मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देओल यांच्यासह सर्व मान्यवरांचे विद्यालयात आगमन होताच के.सी.ई. सोसायटी, जळगावचे संचालक डॉ. ए. आर. राणे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी शाल व श्रीफळ देऊन सर्व प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला. शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांचे विद्यालयात झालेले आगमन हा शाळेसाठी गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला.
शाळेत आगमनानंतर मान्यवरांनी विद्यालयातील विविध विभागांची बारकाईने पाहणी केली. ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा तसेच शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा यांची त्यांनी माहिती घेतली. शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे कार्य याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या परिसरातील विविध बाबींची माहिती घेत असताना त्यांनी शिक्षकांशी तसेच विद्यार्थ्यांशीही आपुलकीने संवाद साधला.
या भेटीतील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देओल यांच्यासह उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला थेट संवाद. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विविध प्रश्न मान्यवरांसमोर मांडले आणि मान्यवरांनीही त्यांच्या प्रश्नांना अत्यंत सहज, समर्पक व प्रेरणादायी उत्तरे दिली. त्यामुळे हा संवाद विद्यार्थ्यांसाठी एक वेगळाच आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.
कु. रीया पाटील या विद्यार्थिनीने प्रधान सचिव श्री. रणजीत सिंग देओल यांना, “आपण शिक्षण सचिव पदापर्यंत पोहोचताना कधी अपयशाचा सामना केला का? आणि त्या वेळी आपण काय केले?” असा प्रश्न विचारला. त्यावर देओल सरांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगताना अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते; मात्र त्यातून खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “माझ्या वाट्यालाही अनेक वेळा अपयश आले; परंतु मी त्यातून खचून गेलो नाही. निरंतर प्रयत्न करत राहिलो. आयुष्यात आपल्याला जे काही करायचे आहे, त्यावर आतापासूनच पूर्णपणे फोकस करा. जीवनात अपयश आले तरी त्याचा विचार करत बसू नका; त्यातून शिकून पुढील तयारी करत राहा. सातत्याने प्रयत्न आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले, तर एक दिवस नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या या उत्तरातून विद्यार्थ्यांना अपयशाकडे अडथळा म्हणून न पाहता ते यशाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासातील एक टप्पा म्हणून स्वीकारण्याची आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली.
यानंतर लौकिक ढगे या विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रात करिअर कसे करता येईल, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मान्यवरांनी क्रीडा क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मेहनत, सातत्य, शिस्त आणि समर्पण आवश्यक असल्याचे सांगितले. क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा मोठी असल्यामुळे अधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी कॉमनवेल्थ स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रातील संधींचाही त्यांनी विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर केतन पाटील या विद्यार्थ्याने “यामुळे भविष्यात नोकऱ्यांची संख्या कमी होऊ शकते का?” असा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मान्यवरांनी संगणकाच्या आगमनाचा संदर्भ देत सांगितले की, संगणकाचा वापर सुरू झाला त्यावेळीही नोकऱ्या कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र प्रत्यक्षात संगणकामुळे रोजगाराची नवीन क्षेत्रे निर्माण झाली आणि नोकरीच्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य व सुयोग्य वापर केल्यास रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि तंत्रज्ञानाचा उपयोग जनहितासाठीही मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कु. वैष्णवी सोनवणे या विद्यार्थिनीने “मला एखादी गोष्ट करण्याची इच्छा असते; मात्र कधी-कधी माझे आई-वडील मला ती गोष्ट करण्यापासून रोखतात. अशा वेळी मी काय करावे?” असा प्रश्न विचारला. यावर मान्यवरांनी आई-वडील आपल्या मुलांनी योग्य मार्गाने जावे, सुरक्षित राहावे आणि आयुष्यात योग्य निर्णय घ्यावेत, यासाठीच प्रयत्न करत असतात, असे सांगितले. आपल्या वयातील अनुभवाच्या मर्यादेमुळे एखादी गोष्ट आपल्याला योग्य वाटू शकते; मात्र पालकांना त्यांच्या अनुभवातून त्यातील योग्य-अयोग्य बाबी अधिक स्पष्टपणे जाणवत असतात. त्यामुळे पालकांशी संवाद साधून आपल्या इच्छेविषयी त्यांना विश्वासात घेणे आणि त्यांचे म्हणणे समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी विद्यार्थिनीला समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या या विविध प्रश्नांमधून त्यांची जिज्ञासा, भविष्याविषयीची उत्सुकता आणि बदलत्या जगाविषयीची जाण प्रकर्षाने दिसून आली. त्याचवेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे ही केवळ प्रश्नांची उत्तरे न राहता त्यांच्या जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शन ठरले. अपयशावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, क्रीडा क्षेत्रात करिअरसाठी मेहनत व सातत्य ठेवणे, कृत्रिम बुद्धिमत्तेकडे संधी म्हणून पाहणे आणि पालकांशी संवाद साधून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे, असे अनेक सकारात्मक संदेश या संवादातून विद्यार्थ्यांना मिळाले.
शाळेतील ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक लॅब आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाची आणि शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली. शाळेतील एकूण शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
या संपूर्ण भेटीचे काटेकोर नियोजन आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, ज्येष्ठ शिक्षक श्री. दिगंबर पाटील, श्रीमती प्रतिभा लोहार, श्री. महेंद्र नेमाडे, श्री. निर्मल चतुर, श्री. चंद्रकांत कोळी, श्रीमती रोहिणी पाटील, श्री. नेमीचंद झोपे, श्री. विवेक मोरे आणि श्री. संदेश करलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या समन्वयातून मान्यवरांच्या स्वागतापासून शाळेची पाहणी, विद्यार्थ्यांशी संवाद आणि संपूर्ण भेटीचे नियोजन अत्यंत व्यवस्थितरीत्या पार पडले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे विद्यालयाला लाभलेली ही मान्यवरांची भेट संस्मरणीय व यशस्वी ठरली.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव श्री. रणजीत सिंग देओल यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांची ए.टी. झांबरे विद्यालयाला झालेली ही भेट विद्यालयासाठी निश्चितच गौरवास्पद ठरली. उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला मनमोकळा संवाद, त्यांच्या प्रश्नांना दिलेली प्रेरणादायी उत्तरे आणि शाळेतील शैक्षणिक वातावरणाची घेतलेली दखल यामुळे या भेटीने विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक व प्रेरणादायी ठसा उमटविला. ज्ञान, जिज्ञासा, प्रयत्न, तंत्रज्ञान आणि सकारात्मक विचार यांची सांगड घालत विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करावी, हा संदेश या भेटीतून अधोरेखित झाला.


