नोबेल सायन्स टॅलेंट सर्च स्पर्धेत प्रिशा दातेची राज्यस्तरीय चमक, पुणे विभागात प्रथम क्रमांक; ISRO, IIT आणि IIM शैक्षणिक सहलीचा लाभ
![]()
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च स्पर्धेत प्रिशा दातेची राज्यस्तरीय चमक
पुणे विभागात प्रथम क्रमांक; ISRO, IIT आणि IIM शैक्षणिक सहलीचा लाभ
पुणे : राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत पुण्यातील डी.एस.के. विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या कु. प्रिशा दाते हिने उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे तिने पुणे विभागातून प्रथम क्रमांक पटकावत ISRO, IIT आणि IIM या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या मोफत अभ्यास सहलीत सहभागी होण्याचा बहुमान मिळवला.
नोबेल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा राज्यातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारी मानली जाते. गणित, विज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयांवर आधारित असलेल्या या स्पर्धेची निवड प्रक्रिया अत्यंत कठोर असून पात्रता फेरी, अॅडव्हान्स लेव्हल परीक्षा आणि मुलाखत अशा विविध टप्प्यांतून विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांमधून अंतिमतः केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
प्रिशा दाते हिला या संपूर्ण प्रवासात प्रख्यात विज्ञान लेखक व प्रेरणादायी वक्ते जयदीप पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ISRO, IIT आणि IIM येथे भेटीदरम्यान तिला देशातील आघाडीच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची तसेच विविध वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. या अनुभवातून विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांविषयीची आवड अधिक दृढ झाल्याचे तिने सांगितले.
“मान्यवर शास्त्रज्ञांच्या भेटी, त्यांचे मार्गदर्शन आणि देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव यामुळे खूप काही शिकायला मिळाले. या संधीमुळे माझ्या भविष्यातील ध्येयांना नवी दिशा मिळाली आहे,” असे मनोगत व्यक्त करत प्रिशाने नोबेल सायन्स टॅलेंट सर्च आणि जयदीप पाटील सर यांचे आभार मानले.
दरम्यान, यावर्षीही राज्यभरातील हजारो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेची उत्साहाने तयारी करत असून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च स्पर्धेला विद्यार्थी व पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

