नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज व्हा! शाळा प्रवेशोत्सव व गुणवत्तावृद्धीवर मुख्याध्यापकांची जिल्हास्तरीय विचारसभा संपन्न , शाळा पूर्वतयारी, विद्यार्थी सुरक्षा, गुणवत्ता वाढ आणि कॉपीमुक्त अभियानावर शिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
![]()
नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज व्हा! शाळा प्रवेशोत्सव व गुणवत्तावृद्धीवर मुख्याध्यापकांची जिल्हास्तरीय विचारसभा संपन्न
शाळा पूर्वतयारी, विद्यार्थी सुरक्षा, गुणवत्ता वाढ आणि कॉपीमुक्त अभियानावर शिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
जळगांव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण विचारसभा नुकतीच ला. ना. विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण होत्या.
यावेळी उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, रागिणी चव्हाण, वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे. के. अण्णा पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष डॉ. आर. डी. निकम यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन रागिणी चव्हाण यांनी केले.
शाळा प्रशासन आणि समित्यांबाबत मार्गदर्शन
सभेच्या प्रारंभी डॉ. आर. डी. निकम यांनी शाळास्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण, त्यांची कार्यपद्धती आणि प्रभावी अंमलबजावणी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. शाळा प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी समित्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभिलेख जतन व बदली प्रक्रियेबाबत माहिती
रागिणी चव्हाण यांनी शालेय स्तरावर जतन करावयाच्या विविध अभिलेखांची माहिती दिली. तसेच अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांमधून अनुदानित शाळांमध्ये होणाऱ्या बदली प्रक्रियेची नवीन कार्यपद्धती स्पष्ट करून मुख्याध्यापकांनी नव्या प्रणालीप्रमाणे कामकाज करावे, असे सांगितले.
संचमान्यता व वेतन प्रक्रियेवर भर
चंद्रकांत गवळी यांनी संचमान्यता प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तर दिलीप पवार यांनी पगार बिले सादर करताना होणाऱ्या त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. पुढील काळात शिक्षक व कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन मिळावे, यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थी सुरक्षा व अनुकंपा धोरणावर विशेष भर
जे. के. अण्णा पाटील यांनी शाळा प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक बाबी, विद्यार्थी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन तसेच शासनाच्या नव्या अनुकंपा धोरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
शाळा प्रवेशोत्सव, गुणवत्ता वाढ आणि विविध योजनांचा लाभ
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाळांनी व्यापक तयारी करावी, असे सांगितले. शाळा परिसर स्वच्छता, विद्यार्थी सुरक्षा, पावसाळ्यातील दक्षता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
तसेच शासनाच्या विविध योजना, शिष्यवृत्ती व लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा, इयत्ता ८ वी एनएमएस परीक्षा, विज्ञान प्रदर्शन आणि इन्स्पायर अवॉर्ड यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात सहभागाचे आवाहन
पर्यावरण संवर्धनासाठी शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमात सर्व शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवून त्याची माहिती अमृतवृक्ष ॲपवर अपलोड करण्याचे निर्देशही देण्यात आले.


कॉपीमुक्त अभियान व गुणवत्तापूर्ण निकालाचे लक्ष्य
जून-जुलै महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पुढील वर्षी गुणवत्तापूर्ण निकाल वाढविण्यासाठी अतिरिक्त तासिका, प्रश्नपत्रिका सराव आणि नियमित मूल्यमापनावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. परीक्षा केंद्रांवर शंभर टक्के सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
सभेच्या शेवटी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. या विचारसभेस जिल्हाभरातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



