शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश; खेड तालुक्यातील चार शिक्षकांना मिळाले शालार्थ आयडी ,अनेक महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; शिक्षकांकडून आमदार म्हात्रे यांचे आभार
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश; खेड तालुक्यातील चार शिक्षकांना मिळाले शालार्थ आयडी
अनेक महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; शिक्षकांकडून आमदार म्हात्रे यांचे आभार
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या चार शिक्षकांच्या शालार्थ आयडीचा प्रश्न कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, अनासपुरे येथील विशाल विलास काते व जयेश सहदेव तांबट, न्यू इंग्लिश स्कूल, कुरवड जावळी येथील जितेंद्र काशीराम पेवेकर तसेच एस. आर. जाधव हायस्कूल, किंजले येथील विष्णु तुळशीराम धूम या चार शिक्षकांची वैयक्तिक मान्यता मिळूनही शालार्थ प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करण्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते.
या प्रकरणी संबंधित शिक्षकांना कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित यश मिळत नव्हते. अखेर महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष अरुण काटे यांनी ही बाब शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून दिली.
दिनांक २२ मे २०२६ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असताना आमदार म्हात्रे यांनी शिक्षण उपसंचालक कोलेकर मॅडम यांना सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने तत्काळ कार्यवाही करत संबंधित चारही शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले.
शालार्थ आयडीचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर संबंधित शिक्षकांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार म्हात्रे सातत्याने पाठपुरावा करत असल्याने शिक्षक वर्गातून त्यांच्या कार्याचे स्वागत होत आहे.
— अरुण काटे
तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, खेड, जि. रत्नागिरी

