अधिकमासानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागाचा शुभारंभ, संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर मंत्रोच्चारात यज्ञारंभ; डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह मान्यवरांकडून सपत्नीक पूजा-अर्चा
![]()
अधिकमासानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागाचा शुभारंभ
संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर मंत्रोच्चारात यज्ञारंभ; डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह मान्यवरांकडून सपत्नीक पूजा-अर्चा
ग्लोबल महातेज वृत्तसेवा | अमळनेर
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात अधिकमासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागास बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी ९ वाजता संकष्टी चतुर्थीच्या पवित्र पर्वावर भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मंदिर परिसर अध्यात्मिक चैतन्याने भारावून गेला.
यागाचे मुख्य यजमान, आशियास्टार आयकॉन अवॉर्ड प्राप्त, अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा समाजकार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुप्रीम पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन विनोद अग्रवाल, मनोहर दीक्षित व मंदार कुलकर्णी यांनीही सपत्नीक धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.
प्रायश्चित्त संकल्प, शांतीपाठ, प्रधान संकल्प, गणपती-वरुण पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, दिग्रक्षण आदी वैदिक कर्मकांडांनंतर लक्ष्मी-नारायण भद्र मंडल स्थापना करण्यात आली. त्यानंतर नारायणपीठ देवता पूजन, नारायण यंत्र स्थापना तसेच नारायण, वराह आणि शालिग्राम देवतांचे राजोपचार पूजन संपन्न झाले. पुरुषसूक्ताच्या षोडश आवर्तनांसह अभिषेक करण्यात आला, तर सहस्त्र तुलसीपत्र अर्चनाने वातावरण अधिक मंगलमय झाले.
दुपारच्या सत्रात नवग्रह व रुद्रकलश स्थापना करून अग्नीमंथनाद्वारे यज्ञकुंड प्रज्वलित करण्यात आले. यानंतर नवग्रह हवन, नारायण सहस्रनाम हवन आणि पायस विशेष आहुतीचे विधी पार पडले.
सायंकाळी ४ वाजता नाशिक येथील व्यासाचार्य वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी यांनी अधिकमास महात्म्य कथेचे रसाळ आणि प्रभावी निरूपण सुरू केले. त्यांच्या ओजस्वी वाणीतून अधिकमासाचे धार्मिक महत्त्व, अध्यात्मिक साधना आणि भक्तीचे मूल्य यांचे विवेचन करण्यात आले. सायंकाळी श्री मंगळग्रह देवतेची महाआरती झाल्यानंतर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, तसेच मंगल सेवेकरी आशिष चौधरी यांच्यासह भाविक आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव यांनी मुख्य पौरोहित्य केले. त्यांना प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, यश जोशी, गणेश जोशी, वैभव लोकांक्षी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, हेमंत गोसावी आणि उमेश पाठक यांनी सहकार्य केले. कथा निरूपणावेळी चंद्रकांत जोशी आणि कॅसिओ वादक गणेश जोशी यांनी संगीत साथ दिली.
छायाचित्र : नितेश बारी, मयूर चौधरी

